रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२

जन्मसिद्ध जातिसंस्था अर्वाचीनच

http://navshakti.co.in/2012/10/22/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D/?fb_action_ids=457313107647800%2C456975471014897&fb_action_types=og.likes&fb_ref=wp&fb_source=other_multiline&action_object_map=%7B%22457313107647800%22%3A396186653783624%2C%22456975471014897%22%3A121667401319926%7D&action_type_map=%7B%22457313107647800%22%3A%22og.likes%22%2C%22456975471014897%22%3A%22og.likes%22%7D&action_ref_map=%7B%22456975471014897%22%3A%22wp%22%7D


वर्ण आणि जातिव्यवस्था या सर्वस्वी वेगळ्या बाबी असून त्यांचा परस्परसंबंध नाही हे आपण मागील भागात पाहिले. प्रत्यक्षात मात्र समाजशास्त्रज्ञांनी वर्ण व जातिव्यवस्थेला एकत्रीत गृहित धरल्याचे दिसते. त्यामुळे जातिसंस्थेच्या उदयामागील कारणांचा नीटसा बोध होवू शकलेला नाही. येथे आपण सर्वप्रथम समाजशास्त्रज्ञांनी जातीची काय लक्षणे सांगितली आहेत हे पाहुयात.अमरकोशात दिलेले जातीचे लक्षण आहे ते असेः  जातिर्जातं च सामान्यं व्यक्तिस्तु पृथुगात्मता
याचा अर्थ असा कि जाती हा वर्गवाचक शब्द असून या वर्गातील प्रत्येक घटकाला व्यक्ति म्हणतात. आचारांच्या पृथुगात्मतेमुळे जे गट पडले आहेत त्यांना जाती ही संज्ञा दिलेली आहे.
2. सेनार्टच्या मते जात ही स्वयंपुर्ण संस्था असून तिचा एक पुढारी व एक सभा असते. जातित्व हे स्वेच्छेने प्राप्त होत नसून ते पुर्णपणे अनुवंशिक असते. एका जातीतील लोक साधारणपणे एकच धंदा करत असतात. रोटीबेटी व्यवहार, खाद्यपेयादी बाबी व शुद्धाशुद्धता याबाबतचे रुढ नियम पाळतात. जातीतील सामाजिक अपराध्यांना बहिष्कृत करणे इ. शिक्षा जातीलाच असतो.
ही वर्णनात्मक व्याख्या आहे हे उघड आहे.
3. डॉ. इरावती कर्वे यांच्या व्याख्येनुसार जातीची वैशिष्ट्ये म्हणजे विवाह फक्त जातीच्या आतच होतो. तिचा विस्तार बहुदा एका मर्यादित भागात व बहुदा एकभाषिक प्रदेशात असतो. जातीला पारंपारिक एक अथवा अधिक धंदे असतात.तिचे इतर जातींच्या अनुषंगाने उच्च अथवा नीच असे कमीअधिक स्थान असते.  ज्या कुटुंबांत विवाहसंबंध होवू शकतो अशा कुटुंबसमुहालाच जात ही संज्ञा प्राप्त होत असल्याने, विस्तारलेला नातेवाईकांचा गट म्हणजे जात होय! जाती आणि जमातींत आश्चर्यकारक साम्य असून पंचायत व्यवस्था, मर्यादित भुभाग ई. साम्ये दोहोंत आहेत. त्यामुळे जाती या प्राचीन जमातींपासुन बनलेल्या आहेत.
जाती वर्णव्यवस्थेप्रमाने ईश्वरनिर्मित नाहीत हे मी आधीच्या भागात स्पष्ट केले आहेच. पुराव्यार्थ वसिष्ठसंहितेत (3.1) म्हटले आहे कि, देशधर्म, जातिधर्म व कुलधर्म यांना श्रुतींचा आधार नसल्याने मनूने ते स्वतःच्या चिंतनातून सांगितले आहेत.  थोडक्यात जातीव्यवस्थेला मुळात धर्मसत्तेचा आधार नाही. एवतेव जातीव्यवस्था धर्माच्या पायावर टिकत नाही. हिंदु धर्माचा जन्माधारीत जातीसंस्थेला कसलाही आधार नाही!
आता मी तत्पुर्वी दिलेल्या जातींच्या व्याख्यांकडे वळुयात.
जात ही आचारांच्या पृथुगात्मतेमुळे बनते असे अमरकोश म्हणतो. येथे आचार म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे हे स्पष्ट नाही. आचारभेद ही मुळात कालसापेक्ष संकल्पना आहे. कालौघात समाजाचे आचारव्यूह बदलत असतात. एका समाजाचे आचार निकट सन्निध्यामुळे, राजकीय/आर्थिक प्रभावांमुळे नकळत अन्य समाजघटकही स्वीकारत जात असतात. हे परस्पराभिसरण पिढय़ानपिढय़ा सुरु असते. वन्य आदिवासी जमाती व भटक्या जमाती फारतर आपले आचार दिर्घकाळ टिकवू शकतात असे म्हणता येईल…पण त्यांतही कधीतरी, सावकाश का होईना, बदल होतच असतो. त्यामुळे आचारांतील विभेदामुळे जाती बनल्या या मताला अर्थ रहात नाही.
सेनार्टची व्याख्या ही वर्णनात्मक व्याख्या आहे. जात ही स्वयंपूर्ण संस्था असते हे खरे आहे, पण ती मुळात निर्माण का झाली याचे उत्तर सेनार्टने शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. जातीची स्वतंत्र पंचायत नेमकी का असते, राजसंस्थाही जातीअंतर्गत मामल्यांत जातपंचायत अथवा गोतसभेने दिलेल्या निर्णयांत ढवळाढवळ का करत नसे याचेही उत्तर सेनार्ट देत नाही.
डॉ. इरावती कर्वेंनीही तशी वर्णनात्मकच व्याख्या केली आहे. विवाह फक्त जातीअंतर्गत होणे हे एक जातीचे वैशिष्ट्य आहे हे खरेच आहे. जातीला पारंपारिक धंदे असतात हेही खरे आहे. पण त्यातून जात-वास्तव आपल्याला समजते. पण डॉ. कर्वेंनी शेवटी केलेले विधान व ते म्हणजे कुटुंबसमुहांची, नात्यांची एकूण गोळाबेरीज म्हणजे जात…हे त्यांचे निरिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. पण त्याच वेळी प्राचीनतम जमातींपासूनच जाती बनल्या हे त्यांचे विधान खोडून काढणे भाग आहे.
खरे तर हे विधानच निराधार आहे. प्राचीन काळी मानवी समाज हा विविध टोळ्यांत विखुरलेला होता. त्यांना आपण आज जमात म्हणतो. प्रत्येक जमातीची एक स्वतंत्र जात बनली असे या विधानावरुन गृहित धरले तर मग प्रत्येक जातीत एकाच जमातीचा समावेश अपरिहार्य असल्याने एकच जातीत श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या उतरंडी कशा निर्माण झाल्या याचे उत्तर मिळत नाही. एकच जमात एकच व्यवसाय घेवून देशभर विखुरली असेही मान्य करता येत नाही. उदाहरणार्थ अहिर या एकाच पुरातन जमातीतील लोक सोनार, शिंपी, आगरी, कोळी, लोहार, धनगर, गवळी अशा अनेक जातींत विखुरले आहेत. म्हणजेच एकाच पुरातन जमातीतील लोक जसे अनेक व्यवसायांत शिरले ते त्या त्या जातीचे बनले असे दिसते. नुसते जातीचे नव्हे तर पोटजातीचे. उदा. अहिर सोनार ही सोनार या जातीतील एक पोटजात आहे.  मुळचे एकाच जमातीतील असुनही त्यांच्यात बेटीव्यवहार होत नाही.
तसेच एकाच जातीत अनेक जमातींतील समाजघटक सामील असल्याचे आपण पाहु शकतो. उदाहरनार्थ धनगर, वंजारी, ब्राह्मण, गवळी, सोनार, कोष्टी इइइइइ. त्यामुळे जमातींची जात बनलेली नाही असे स्पष्ट म्हणता येते. शिवाय मुळात भारतीय मानवी समाज हा पुरातन काळी अगणित जमातींतच विखुरला होता हे म्हटल्यानंतर जाती बनायला विविध जमातींतीलच लोक येणार हे उघड आहे. जाती बनवायला माणसे कोठुन आणनार…आणि आणली तर मग जमातींचे काय होणार?
आपण येथेवर जातीव्यवस्थेबद्दलची विद्वानांची मते पाहिली.
या सर्वांनी गृहित धरलेय कि जणु काही या सर्व हजारो जाती मुळापासुनच होत्या! जात म्हणजे पारंपारिक आचारविशेषांचे उल्लंघन न करणारे सामाजिक गट म्हणजे जात! जातीअंतर्गतच विवाह हे जातीचे मुख्य लक्षण आहे असेही म्हटले जाते…पण तेही खरे नाही. अशी चुकीची गृहितके घेतल्याने मुळ प्रश्नाचे उत्तर मिळणे अशक्यप्राय  होते आणि तसे ते झालेही. आज ज्या जाती आहेत त्या सर्वच अवघ्या एक हजार वर्षांपूर्वीही अस्तित्वात नव्हत्या. दोन हजार वर्षांपूर्वी त्या  सीमित होत्या.
दुसरे असे कि पुरातन काळी समाजपंचायत भरत असे. जातीनिहाय पंचायती अस्तित्वातच नव्हत्या. याचे कारण म्हणजे भारत हा पुरातन काळी गणराज्य व्यवस्था पाळत होता. नंतर राजसंस्था आली तरी तिचा परिघ मर्यादित प्रदेशापुरताच असे. मुळात ही गणराज्ये असोत कि राज्ये, ही विशिष्ट टोळ्यांचीच बनलेली असत. आणि त्या टोळीराज्यांतही जाती होत्याच हे आपण बौद्ध साहित्यातुन व्यापकपणे पाहू शकतो. या सर्वांचे निवाडे जातीपंचायती नव्हेत तर गणसभा वा राजसभा करत असे. प्रत्येक जातीची स्वतंत्र जात पंचायत असावी एवढा जातींचा परीघ विस्तारितही नव्हता कि आचारनिर्बंध चांडाळ वगळता कठोरही नव्हते.
अजून एक महत्वाची बाब म्हणजे जाती अपरिवर्तनीय आहेत व होत्या ही बाब खरी नाही. इतिहासात अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. रथकार, सूत, मागध, बंदी, आयोगव, धिग्वन अशा अनेक जाती, त्यांचे व्यवसायच लोप पावल्याने नष्ट झालेल्या दिसतात. त्याच वेळीस जसजसे नवे व्यवसाय पुढे आले, सेवा पुढे आल्या तसतशा नवीन जाती व पोटजातीही निर्माण होत आलेल्या आहेत. ही प्रक्रिया दहाव्या-अकराव्या शतकापर्यंत सुरु राहिलेली दिसते. जातीबदलही करता येत होता याचेही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ नंपुतीरी ब्राह्मण अथवा कोकणस्थ ब्राह्मण हे मुळचे ब्राह्मण नव्हेत. अन्य जातींतून त्यांचे जात्युंतर झालेले आहे. ज्ञातिप्रमुखाला वा राजसंस्थेला धन देवून जात बदलताही येत असे असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या वैदिक संस्कृतीचा इतिहास या ग्रंथात नोंदवून ठेवले आहे.
म्हणजे जातीलोप होणे, नवीन जाती बनणे वा जातीबदल करणे ही जी एक गतीशीलता होती जी समाजाच्या प्रवाहमानतेशी जुळून होती असे म्हणता येते. कोणतीही जात सर्वस्वी आभाळातून पडत नसते. म्हणजे आहे त्याच समाजातील काही कुशल घटक ती सेवा द्यायला वेगळे होतात. त्यांची जात बनते हे आपले सामाजिक वास्तव होते. थोडक्यात जन्मसिद्ध जातीव्यवस्थेचा अवलंब भारतीय समाजाने उत्तरकालातच केलेला दिसतो. थोडक्यात जातीसंस्था पुरातन असली तरी जन्मसिद्ध जातिसंस्था मात्र अर्वाचीन असल्याचे लक्षात येते.
व्यवसायनिहाय सामाजिक विभागण्या होणे जगभर घडले आहे. पण तेथे जन्माधारित जातीव्यवस्था नाही. भारतातच अशी व्यवस्था का आणि ती कशी निर्माण झाली असावी?
धर्मशास्त्रांनी जातीप्रथा आणल्या व निरंकुशपणे व अन्याय्यपद्धतीने राबवल्या हा काही पुरोगाम्यांचा लाडका तर्क व आरोप असतो. या आरोपामुळे जातीव्यवस्थेच्या निर्मितीचे कोडे उलगडता आलेले नाही व ब्राह्मणी व्यवस्थेला जबाबदार धरत एकांगी संशोधन केले तर उलगडा होणारही नाही हेही तेवढेच खरे आहे. शृद्र म्हणजे आर्यांनी हरवलेल्या एतद्देशिय जमाती होत्या हेही मत कोणत्याही पुराव्याच्या आधारावर टिकत नाही, कारण आर्य आक्रमण सिद्धांत मोडीत निघाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,  Whatever the degree of conflict, it was not a conflict of race. It was a conflict which had arisen on account of difference of religions. That this conflict was religious and not racial is evidenced by the Reg Veda itself. (B�WS Vol. 7)
म्हणजेच शुद्र या हरलेल्या जमाती होत्या आणि त्यांच्यातूनच वैदिक आर्यांनी आपल्या सेवेसाठी शुद्र जाती निर्माण केल्या हे मत टिकत नाही. म्हणजे जित विरुद्ध पराजित हे कारण जातीव्यवस्थेच्या निर्मितीमागे देता येत नाही. आणि हा दोन धर्मियांतील युद्धातून निर्माण होणारी परिस्थिती जेंव्हा असते तेंव्हा जित धर्मीय पराजित धर्मियांचे धार्मिक अस्तित्व संपवून टाकत असतात, प्रतीके, पुजास्थाने नष्ट करत असतात. पण असेही घडलेले दिसत नाही. म्हणजे मग हा संघर्ष नेमक्या कोणत्या तीव्रतेचा होता? हा रक्तरंजित, खुनशी, धर्मप्रसारासाठीचा संघर्ष होता असे म्हणता येत नाही. सुर-असुरांच्या युद्धांतून अशा संघर्षाची मित्थके शोधली गेलेली आहेत. सुर हे यज्ञधर्मी तर असुर हे शिवसंस्कृतीचे असे ढोबळमानाने विभाजन केले जाते. त्यांच्यातील संघर्षाच्या अनेक पौराणिक कथा येतात. त्यांत कधी सुरांचा तर कधी असुरांचा पराभव झाल्याचे दिसते. पण अंततः सुरांचाच पराभव झाल्याचे दिसते कारण यज्ञसंस्कृती (तत्वज्ञान वगळता) पुर्णपणे लोप पावली तर असुरांची शैवप्रधान संस्कृती मात्र अव्याहत टिकून राहिली.
उलट कालौघात वैदिक धर्मीय शैव धारेत आपले काही वैदिक संस्कार कायम ठेवत मिळुन-मिसळून गेले. अनुकरणाच्या भावनेतून शैव ब्राह्मणांनीही ते संस्कार उचलले. वैदिकजनही त्याच वेळेस जातिव्यवस्थेचे एक भाग बनले व जातीची उतरंड आपापल्या पोटजातींतही पाळू लागले. त्यामुळेही एक वर्णीय म्हणूनची समता किमान ब्राह्मणांत तरी दिसायला हवी. ती तशी दिसत नाही. शोषणासाठी ब्राह्मणांनी जाती बनवल्या नाहीत हेही उघड आहे. पुरोहित या नात्याने  अगदी जातीव्यवस्था नसती तरी त्यांनी धार्मिक शोषण केलेच असते. त्यासाठी त्यांना एवढय़ा गुंतागुंतीची सामाजिक संरचना करण्याची गरज नव्हती. आणि करण्याचा प्रयत्न केला असता तर समाजाने व राजसत्तांनीही ती स्वीकारली नसती. धर्मसत्तेचे शोषण हा अत्यंत वेगळा विषय आहे. प्रस्तुत जातिसंस्थेच्या निर्मितीशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे जातीव्यवस्थेच्या निर्मितीची कारणे अन्यत्रच शोधणे भाग आहे. ते पुढील भागात…
संजय सोनवणी    22/10/12

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा