सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२

तुही जात कंची रे? कपिल पाटील

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=10

तुही जात कंची रे?
कपिल पाटील



कपिल पाटील विचार रद पवार यांनी राजू शेट्टी यांचा एकेरी उल्लेख केला. पवार साहेबांचं वय लक्षात घेता, हा त्यांचा अधिकार आहे असं म्हणता येईल. पण पवार साहेबांनी राजू शेट्टींची चक्क जात काढली.
राजू शेट्टी कुणी ऐरेगैरे नव्हेत. खासदार आहेत. राज्यसभेवर नव्हेत. शरद पवार ज्या लोकसभेत निवडून गेलेत त्याच सभागृहात राजू शेट्टी स्वबळावर निवडून गेलेत. घरात राजकारणाची परंपरा नसतानाही ते खासदार झाले. ते नुसते खासदार नाहीत. शेतकरी आहेत. शेतकरी योद्धा आहेत.
तरीही शरद पवार म्हणाले 'कोण कुठला राजू शेट्टी?'
शरद पवार यांची प्रतिमा केवळ राष्ट्रवादी या पक्षाचे नेते इतकीच नाही. देशाचे कृषिमंत्री झाले म्हणून नाही. त्या आधी तीन-चार दशकापासून महाराष्ट्र आणि देश त्यांना शेतकर्‍यांचा नेता म्हणून ओळखत आहे. इंग्रजी वर्तमानपत्रे भले त्यांना स्ट्राँग मराठा मॅन म्हणून म्हणत असतील. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांनी शरद पवारांचा उल्लेख नेहमी जाणता राजा असा केला. जाणता राजा ही काही साधीसुधी पदवी नव्हे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवछत्रपतींना उद्देशून जाणता राजा म्हटलं जात होतं. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि जात वास्तव माहीत असलेल्या शरद पवारांनी राजू शेट्टीची चक्क जात काढली.
राजू शेट्टी जैन समाजाचे आहेत. आणि त्याच समाजाच्या ताब्यात असलेले कारखाने ते चालू देतात, आणि मराठय़ांचे कारखाने बंद पाडतात, अशी आगच पवारांनी लावून दिली. वस्तुस्थिती ही नाही. शरद पवारांना ते माहीत नाही काय? त्यांना चुकीची माहिती दिली गेली, असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल. पवारांच्या वक्तव्यात नुसती जात नाही सांगितली. त्यांच्या समाजाचे आणि आमच्या समाजाचे अशी सरळ विभागणी त्यांनी केली आहे. ते आणि आपण अशी द्वेषमूलक विभागणी आणि हाक त्यात आहे. म्हणून त्या वक्तव्यावर पहिल्यांदा विश्‍वासच बसला नाही. दहा वेळा तपासून घेतल्यावर धक्काच बसला.
विश्‍वास यासाठी बसला नाही. कारण याआधी मराठय़ांचे लाडके नेते असले तरी शरद पवार मराठा नेते म्हणून कधी वागले, वावरले नाहीत. यशवंतराव चव्हाणांच्या या शिष्याने आणि नंतर एस.एम. जोशी यांनाही त्याच श्रद्धेने राजकीय पितृत्व बहाल करणारे शरद पवार यांनी आपली प्रतिमाही तितकीच व्यापक, सर्वसमावेशक, न्यायी आणि सेक्युलर बनवली होती. शरद पवारांचं राजकारण आणि त्यांच्या विकासाचं मॉडेल मान्य नसणार्‍यांच्या मनातही पवारांची ही प्रतिमा कायम होती. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी फारुख अब्दुलांचे चिरंजीव आणि आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असलेले ओमर अब्दुला शिक्षणासाठी राहत होते. पवार दाम्पत्याने त्यांना पुत्रवत प्रेम दिलं.
पवारसाहेब दिल्लीत होते. केंद्रात मंत्री होते. तेव्हा त्यांच्याकडे निहाल अहमद यांच्यासोबत जाण्याचा एकदा प्रसंग आला होता. तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात जनता दलाने रवी पाटील यांना उमेदवारी दिली होती. लिंगायत मत फुटून सुशीलकुमार शिंदे पडतील, याची काळजी त्यांना लागली होती. शिंदेसाहेबही लिंगायतच आहेत, असं मी त्यांना तेव्हा सांगितलं होतं. पण तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये शिंदेबद्दलचं प्रेम आणि निवडणुकीत त्यांना दगाफटका होऊ शकतो याची अस्वस्थता पाहिली होती.
आणखी एक प्रसंग आठवतो. पुलोद मधलं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर शरद पवार दहा वर्षे विरोधी पक्षांचं नेतृत्व करत होते. त्या उत्तर काळात एका अनौपचारिक पत्रकार परिषदेत पवारांनी प्रशासनातल्या, पोलिसांमधल्या अधिकार्‍यांमध्येही जात व धर्म कसा घट्ट रुतलेला असतो, याचा मुख्यमंत्री काळातला किस्सा त्यांनी ऐकवला होता. दंगलीचं रिपोर्टिंग मुख्यमंत्र्यांना करायला येणारे अधिकारी त्यांच्या लोकांनी हे केलं आणि आपल्या लोकांनी... असा शब्द प्रयोग करत. त्यांचे कोण? आणि आपले कोण? असं मुख्यमंत्र्यांनी विचारल्यावर ते मुस्लीम आणि आपले हिंदू असं अधिकारी सांगत. वास्तव सांगताना त्याबद्दलचं वैषम्यही पवारांनी त्यावेळी सांगितलं होतं. आणि आता तेच शरद पवार त्यांच्या समाजाचे आणि आपला समाजाचे असा उल्लेख करते झाले. शरद जोशी यांनी शेतकर्‍यांचे अभूतपूर्व आंदोलन उभं केलं. तेव्हा महसूलमंत्री असलेल्या शालिनीताई पाटील यांनी त्यांना ब्राह्मण ठरवलं, तेव्हा शरद जोशींच्या बाजूने उभे राहिलेले शरद पवार आता राजू शेट्टींना जैन ठरवत आहेत.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मराठी भाषिक जैनांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्राला लागून असणार्‍या कर्नाटकातही जैन संख्या मोठी आहे. आणि याच पट्यात लिंगायत (धर्म-वीर शैव) समाजही मोठय़ा संख्येने आहे. दोघांची महाराष्ट्राचं नेतृत्व करणार्‍या नेत्यांनी शेतकर्‍यांमध्ये प्रदेशाची व जातीची भिंत कधी घातली नव्हती. त्यांचे लोक आणि आपले लोक अशी द्वेषाची विभागणी कधी केली नव्हती. दु:ख आणि क्लेश याचे होतात की, ही विभागणी दुसर्‍या कुणी नव्हे, तर शरद पवार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा