मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

बाळासाहेब नामांतराच्या विरोधात नव्हतेच कुमार कदम Sunday, November 18, 2012

http://online2.esakal.com/esakal/20121118/5211537485135568328.htm


बाळासाहेब नामांतराच्या विरोधात नव्हतेच
कुमार कदम
Sunday, November 18, 2012 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधात होते असा एक समज काही जण आजही मनात बाळगून आहेत. मात्र त्या संदर्भात घडलेल्या एका घटनेचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या दरम्यान घडलेली ती घटना मुद्दाम नमूद करायला हवी, असं मला वाटतं. 

"हिंदुस्थान समाचार' या वृत्तसंस्थेमध्ये वार्ताहर म्हणून मी काम करीत होतो, तेव्हाची गोष्ट. नामांतराच्या मागणीसाठी दलित पॅन्थर आणि डाव्या पक्षांनी संपूर्ण महाराष्ट्रातून औरंगाबादपर्यंत "लॉंग मार्च' काढला होता. शांतारामबापू जोशी त्यावेळी औरंगाबाद येथे "हिंदुस्थान समाचार'चे मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून काम पहात होते. त्यांच्या सूचनेवरून मला आमच्या ऑफिसने रिपोर्टिंगसाठी औरंगाबादला पाठविले होते. तिथे नामांतराच्या प्रश्नावरून गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव यांच्याशी बऱ्याच मनमोकळ्या चर्चा करता आल्या.

मुंबईला परत आल्यावर एकदा अशीच बाळासाहेबांची भेट झाली. बोलता बोलता गोविंदभाई आणि अनंत भालेराव यांच्याशी झालेल्या खासगी चर्चांची माहिती मी बाळासाहेबांना दिली.

योगायोगाने, या संदर्भात काही महिन्यांनी आणखी एक घटना घडली. विधान भवनातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बैठकीच्या निमित्ताने रा. सू. गवई यांची भेट झाली. बोलता बोलता ते म्हणाले की, मला बाळासाहेबांना भेटायचं आहे. भेटीची वेळ ठरवतोस का? मी ती जबाबदारी घेतली व थेट बाळासाहेबांशी संपर्क केला. त्यांनी गवईसाहेबांना मातोश्रीवर घेऊन यायला सांगितले. गवईसाहेब आणि मी, गवईसाहेबांच्या लाल दिव्याच्या गाडीतून ठरल्याप्रमाणे मातोश्री बंगल्यावर गेलो.

तेथे दोघांचे अनेक विषयांवर बोलणे झाले. नामांतराचा विषय उपस्थित झाला तेव्हा बाळासाहेब त्यांच्या विशिष्ट शैलीत तिखटपणे बोलले, गवईसाहेब मात्र खूप शांतपणे सारे काही ऐकून घेत होते. तरीही एकूण चर्चा ही खूप खेळीमेळीत सुरू होती. त्यावेळी बाळासाहेबांनी जे काही म्हटले ते महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.

बाळासाहेब म्हणाले, विद्यापीठाच्या नामांतरास माझा बिलकुल विरोध नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतराबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. मराठवाडा या नावास एक इतिहास आहे. निजामाविरुद्ध जो लढा तेथील जनतेने दिला, तो मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणूनच इतिहासात ओळखला जातो. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबरीने गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, शंकरराव चव्हाण ही मंडळीसुद्धा सहभागी होती. मराठवाड्याला एक लढाऊ इतिहास आहे. हा लढाऊ इतिहास पुसला जाऊ नये, असा माझा आग्रह आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावास मी विरोध करण्याचे कारणच नाही, पण मराठवाडा हे नाव कायम ठेवून विद्यापीठाचे नामांतर करणार असाल तर माझा त्या नामांतराला पूर्ण पाठिंबा आहे. त्यासाठी विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव द्या आणि मराठवाड्याची अस्मिता कायम ठेवून नामांतर करा, अशी माझी भूमिका आहे. तुमचे काय म्हणणे आहे?' असा प्रश्नही त्यांनी गवईसाहेबांना केला. बाळासाहेबांची ही भूमिका गवईसाहेबांना आवडली व ते जबरदस्त खूष झाले.

सायंकाळी चार वाजता सुरू झालेली चर्चा सुमारे तीन-साडेतीन तास चालली. सायंकाळचे सात वाजून गेले होते. बाळासाहेबांनी चर्चा एकदम थांबविली. गवईसाहेबांना ते म्हणाले, "गवई, माझी बिअर पिण्याची वेळ झाली आहे. थांबणार असाल तर तुम्ही सांगाल तो ब्रॅंड देतो, नाही तर रजा घेऊ.' अर्थात, गवईसाहेबांनी त्या सायंकाळी बाळासाहेबांबरोबर थांबणे पसंत केले...!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीचे संघटक सचिव आहेत.) 
Masala Tea

1 टिप्पणी: