महाराष्ट्राला सामाजिक प्रबोधनासाठी झटणाऱ्या संघटना व कार्यकर्त्यांचे मोहोळ मानले जाते. राज्यात फुले-आंबेडकरी विचारांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. सामाजिक न्याय, लोकप्रबोधन, अत्याचार निवारण, शिक्षण, पुनर्वसन आदी क्षेत्रात या संघटना काम करतात. बहुजन समाजातील नानाविध प्रश्न ऐरणीवर आणून काम करणाऱ्या या संघटना विविध समाजघटकांत पाय रोवून उभ्या आहेत. या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, मुलनिवासी संघ आदींचा बराच बोलबाला आहे.
संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर पुणे पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते शाम सातपुते यांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीवरून हा एफ.आय.आर. दाखल झाला आहे.
खेडेकरांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकात त्यांनी जातीय दंगली व कत्तलींना चिथावणी देणारे लेखन केल्याबद्दल कलम १५३(अ), ५०५(२) व ३४ अन्वये खेडेकर, त्यांचे मुद्रक व प्रकाशक यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या कलमाखाली एकत्रित मिळून ७ वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. ‘‘विविध गटात तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेषाच्या किंवा दुष्टाव्याच्या भावना वाढविल्यास’’ १५३(अ) खाली आणि ‘‘अफवा, भयप्रद वृत्त याद्वारे निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषक गट किंवा जाती, समाज यांच्यामध्ये शत्रुत्वाची, द्वेषाची, दुष्टाव्याची निर्मिती होण्याची शक्यता असेल’’ तर कलम ५०५(२) खाली गुन्हा दाखल केला जातो.
खेडेकरांचे हे पुस्तक सुमारे ७ महिन्यांपूर्वी (१३ नोव्हे. २०१०) प्रकाशित झाले आहे. जिजाऊ प्रकाशनाचे हे पुस्तक ५५ पानांचे असून त्याची किंमत २५ रुपये आहे. जिजाऊ प्रकाशनाचे हे १५० वे पुस्तक असून खेडेकरांनी आजवर सुमारे ५० पुस्तके किंवा छोटय़ा-छोटय़ा पुस्तिका लिहिलेल्या आहेत.
खेडेकर हे बहुजन समाजातील बाहुबली नेते असून आक्रमक वक्ते आहेत. ते उत्तम संघटक आहेत. त्यांच्यामागे मराठा व कुणबी तरुणांचा मोठा संच आहे. त्यांच्या संघटनेला २० वर्षे पूर्ण झाली असून संघटनेचे काम वेगवेगळ्या ३१ कक्षांद्वारे (सेल) चालते. विदर्भ, मराठवाडय़ात या संघटनेचा चांगला जोर आहे. भांडारकर इन्स्टिटय़ूटवरील हल्ला, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत यांच्यावरील हल्ले, पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविणे, रायगडावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे अांदोलन इत्यादींमुळे ते आणि त्यांचे कार्यकर्ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. या संघटनांचा राज्यात फार मोठा दरारा आहे. त्यांच्या विरोधात ‘ब्र’ उच्चारायलाही प्रसार माध्यमातील दिग्गज आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी घाबरतात. खेडेकर शिवधर्माचे संस्थापक धर्मगुरू आहेत. मुस्लीम खलि ज्याप्रमाणे धर्मसत्ता आणि राजसत्तेचे एकमेव सूत्रधार असत, त्याप्रमाणे सत्ताधारी जातींचे किंगमेकर आणि शिवधर्माचे शंकराचार्य बनण्याची खेडेकरांची महत्त्वाकांक्षा आहे. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. खेडेकरांच्या संघटनेतील ‘सेवासंघ’ या शब्दाचा अर्थ सामाजिक सेवा अथवा सामाजिक कार्य असा नसून मुळात ती सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची एकजातीय ‘युनियन’ आहे. मराठा समाजातील सरकारी नोकरांना बदली, बढती, खाते अंतर्गत चौकशी किंवा शिक्षा या कामी मदत किंवा संरक्षण पुरविण्याचे कार्य ही संघटना करते. संघटनेला कर्मचाऱ्यांकडून फार मोठे आíथक पाठबळ दिले जाते. खेडेकर त्यासाठी ‘मराठा टॅक्स’ घेतात, असे त्यांनी त्यांच्याच एका पुस्तकात नमूद केले आहे. (पाहा- कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृष्ठ क्र. १७) अन्य मार्गानीही पसा उभा केला जातो. सरकारी नोकरांच्या अनेक संघटना असल्या तरी थेट जातीच्या नावावर कार्यरत असलेली राज्यातील ही पहिली आणि एकमेव संघटना असावी. खेडेकर स्वत: कार्यकारी अभियंता या पदावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातून चार वर्षांपूर्वी निवृत्त झालेले आहेत. खेडेकरांना सत्ताधाऱ्यांचा थेट वरदहस्त असल्याची लोकभावना आहे. त्यांच्या ‘मराठा मार्ग’ या मासिकाच्या एका अंकात त्यांनी आपल्या ‘गॉडफादर्सचा’ ऋणनिर्देशही केलेला होता. खेडेकर स्वत: जन्माने कुणबी समाजाचे आहेत. हा समाज ओ.बी.सी.मध्ये आहे. त्यांच्या पत्नी सौ. रेखाताई भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या १५ वर्षे आमदार होत्या. एका ओबीसी नेत्याने खुल्या प्रवर्गातील आणि तेही सत्ताधारी असलेल्या जातीची संघटना उभारण्याची, ती सक्षमपणे चालविण्याची आणि तिला एक ‘दादा’ संघटना म्हणून नावारूपाला आणण्याची ही घटना समाजशास्त्रीयदृष्टय़ा लक्षणीय होय. त्यातून खेडेकरांचे नेतृत्व आक्रमक, महत्त्वाकांक्षी, जिगरबाज आणि बलदंड असल्याची साक्ष पटते. अशा खेडेकरांच्या साहित्याचे सोशिओ कल्चरल ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण कुणालाही उत्तरदायी (अकाऊंटेबल) नाही, असे मानणाऱ्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख यातून आपल्याला मिळू शकतो.
ते आणि त्यांचे कार्यकर्ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. या संघटनांचा राज्यात फार मोठा दरारा आहे. त्यांच्या विरोधात ‘ब्र’ उच्चारायलाही प्रसार माध्यमातील दिग्गज आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी घाबरतात. खेडेकर शिवधर्माचे संस्थापक धर्मगुरू आहेत.
खेडेकर आपल्या पुस्तकात स्पष्टपणे म्हणतात, ‘‘हिटलरशाहीप्रमाणेच प्रतिज्ञा मराठा व बहुजनांच्या मनावर कोरावी लागेल.’’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ५५) अशा प्रकारे आपला आदर्श हिटलर असल्याची जाहीर कबुली ते देतात. ज्यूंच्या कत्तली करणारा हिटलर हा त्यांचा आदर्श असल्यामुळेच ते म्हणतात, ‘‘विचारांच्या लढाईला दणक्यांची जोड पाहिजेच, म्हणून भांडारकर तो झाँकी है! या संभाजी ब्रिगेडने दिलेल्या नाऱ्याचा अर्थ समजून घ्या.’’ (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ३१) खेडेकर पुढे असेही म्हणतात, ‘‘लोकसत्ताचे कार्यालय फोडणे, तोडणे याचे आम्ही पूर्णपणे समर्थन करतो.’’ (प्रसार माध्यमातील दहशतवाद, पृ. ११) आपण फुले-आंबेडकरवादी असल्याचाही दावा खेडेकर करीत असतात. (शिवधर्म प्रेरणा व ब्राह्मण जेम्स लेन, पृ. १२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात वावरलेल्या दादासाहेब रूपवते यांचे वकील पुत्र अॅड. संघराज रूपवते यांच्याबद्दल खेडेकर म्हणतात, ‘‘अॅड. संघराज रूपवतेंनी आंबेडकरी चळवळ हे नाव वापरून आंबेडकरांच्या मोठेपणाला आपल्या विकृतीची झालर लावू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजनिक व जागतिक व्यक्तीत्त्व आहे. त्यांचे तत्त्वज्ञान मानवतावादी आहे. ते केवळ महार व नवबौद्धांच्याच मालकीसाठी नाही. मराठा सेवा संघाचे कार्यही आंबेडकरवादी आहे. बहुजन विघटनाला वा विकृतीला आंबेडकरांनी मान्यता दिलेली नाही. अॅॅड. रूपवते यांनी आपली विकृती बाबासाहेबांच्या वटवृक्षाखाली लपवू नये. त्यांनी जेम्स लेनचे हे पुस्तक पूर्णपणे वाचले आहे. पारायणे केली आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायास व आदर्शास स्मरून कोणते अगाध ज्ञान प्राप्त केले त्याचा हिशोब आम्हा आंबेडकरवाद्यांसमोर प्रामाणिकपणे मांडावा.’’ (शिवधर्म प्रेरणा, पृ.११, १२) यातून ते आणि त्यांची संघटना आंबेडकरवादी असल्याचा खेडेकरांचा दावा स्पष्ट होतो. खेडेकर एक व्यक्ती म्हणून व त्यांची संघटना एक स्वतंत्र संघटना म्हणून काय करतात याच्याशी आम्हाला फारसे देणेघेणे नाही. मात्र अांबेडकरवादी खेडेकर आणि अांबेडकरवादी मराठा सेवा संघ जर काही लिहीत असतील, कृती करीत असतील आणि त्या जर अांबेडकरवादाच्या विपरीत असतील तर त्याची दखल घेऊन त्याचे अॉडिट करणे आम्हा चळवळवाल्यांचे कर्तव्य बनते.
हिटलर आणि फुले-आंबेडकर यांना एका पंक्तीत बसविणारे खेडेकर खैरलांजी हत्याकांडाबाबत म्हणतात, ‘‘गावागावात मराठा समाजच दलितांवर अत्याचार करतो, असे चित्र निर्माण करण्यासाठी भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजी प्रकरणाला अत्यंत विकृत स्वरूप दिले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या धंदेवाईक एनजीओंनी हे प्रकरण जाणीवपूर्वक पेटविले. त्यातून मराठा व दलित हे एकमेकांचे शत्रू म्हणून उभे करण्यात ब्राह्मणी रामदासी यंत्रणा यशस्वी झाली.’’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४९) खैरलांजीत भय्यालाल भोतमांगे या बौद्धाचा वंशसंहार झाला. त्यांची दोन तरणीबांड मुले, एक मुलगी व पत्नी यांना जमावाने क्रूरपणे ठार मारले. सारा देश ज्या घटनेने हादरला, संपूर्ण बौद्धजगत ज्या घटनेमुळे संतप्त झाले, जगभरचे मानवतावादी न्यायासाठी पुढे आले, त्या अमानुष घटनेकडे पाहण्याचा खेडेकरांचा हा संवेदनाहीन दृष्टिकोन फुले-आंबेडकरवादी आहे काय?
भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख खेडेकर आपल्या ‘बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास’ या ग्रंथात पुढील जातीवाचक शब्दात करतात, ‘‘महार समाजाने ब्रिटिशांना मदत केली याचा प्रचंड राग बामणांना आहे. पुढे इंग्रज भारतातून गेल्यावर ब्राम्हणांनी गांधी हत्या घडवून आणली. परंतु डॉ. आंबेडकर या महाराने देशाची समतावादी राज्यघटना लिहून ब्राह्मणाच्या हक्क अधिकारावर गंडांतर आणले. म्हणून ब्राह्मणांनी डॉ. आंबेडकरांची हत्या घडवून आणली.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ४०) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम जातीवाचक उल्लेख करण्याची काय गरज होती तेच कळत नाही.
मराठा समाजातील सरकारी नोकरांना बदली, बढती, खाते अंतर्गत चौकशी किंवा शिक्षा या कामी मदत किंवा संरक्षण पुरविण्याचे कार्य ही संघटना करते. संघटनेला कर्मचाऱ्यांकडून फार मोठे आíथक पाठबळ दिले जाते. खेडेकर त्यासाठी ‘मराठा टॅक्स’ घेतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना बनविण्यासाठी रक्ताचे पाणी केले. त्यांच्या अपार परिश्रम, विद्वत्ता, तळमळ आणि त्यागातून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेवर आधारलेली घटना देशाला मिळाली. हजारो वर्षे लिहिण्या-वाचण्याची व बोलण्याची बंदी असलेला बहुजन समाजघटनेच्या कलम १९ मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्याने जागतिक भरारी घेऊ लागला. लोकशाही, शांततामय सहजीवन आणि बुद्धाचा परिवर्तनाचा मार्ग बाबासाहेबांनी दिला. चर्चा आणि चिकित्सा यामुळेच दलित, उपेक्षित, वंचितांचा विकास होऊ शकतो, हा बाबासाहेबांचा विश्वास होता. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय चर्चा होते तेव्हा तेव्हा त्या चर्चेचा बहुजनांना लाभच होतो असा अनुभव आहे. उदा. मंडल आयोगाच्या विरोधात रान पेटविले गेले. नामांतर, रीडल्स, उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षण, जातवार जनगणना यांना विरोध झाला. पण महाचर्चा झडल्या. त्यातून बहुजनांमध्ये जागृतीच्या लाटा उसळल्या. चर्चा म्हणजे जणू बहुजनांचे शक्तिवर्धक टॉनिक होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणे म्हणजे बोलते-लिहिते झालेल्या समाजाला पुन्हा मूक बनविणे होय. चर्चा बंद, वादविवाद बंद हा हिटलरीच खाक्या होय. खेडेकर चक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतात. ते म्हणतात, ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे समाज व्यवस्था नाकारणे, देश व गावगाडा नाकारणे, सार्वजनिक ठिकाणी नग्न फिरणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी नग्न स्त्री-पुरुष एकत्र येऊन संभोग क्रीडा करणे अशा बाबीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही मागणी म्हणजे राज्यघटना रद्द ठरवून पुन्हा मनुस्मृतीच लागू करावी या प्रकारची आहे.’’ ( शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४, ८) डॉ. आंबेडकरांच्या या लाडक्या कलमाविरुद्ध कुऱ्हाड चालवणारे खेडेकर ‘आंबेडकरवादी’ असल्याचे सांगत असतील तर त्यांची कथनी आणि करणी यातील विसंगती चळवळीने ओळखली पाहिजे. मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले होते, म्हणूनच ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या भारतीय घटनेचे निर्माते असलेले बाबासाहेब स्वीकारणे म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच, तथापि त्याचा अतिरेक टाळावा असे खेडेकरांनी म्हटले असते तर समजण्याजोगे होते.
चर्चा म्हणजे जणू बहुजनांचे शक्तिवर्धक टॉनिक होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणे म्हणजे बोलते-लिहिते झालेल्या समाजाला पुन्हा मूक बनविणे होय. चर्चा बंद, वादविवाद बंद हा हिटलरीच खाक्या होय. खेडेकर चक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतात.
राज्यघटनेच्या कलम १७ द्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. हजारो वर्षे अस्पृश्यांना अमानवी जीवन जगावे लागले. अन्याय, अत्याचार आणि अपमानाचे चटके सोसावे लागले. कोणीही फुले-आंबेडकरवादी कोणत्याही स्वरूपाच्या अस्पृश्यतेचे समर्थन करूच शकत नाही. खेडेकर आणि त्यांनी स्थापन केलेला ‘शिवराज्य पार्टी’ हा राजकीय पक्ष अस्पृश्यतेचे उघडपणे समर्थन करतात. ते म्हणतात, ‘‘ब्राह्मणांनी १०० वर्ष अस्पृश्य म्हणून जगावे. बहुजन समाज ब्राह्मणांचा विटाळ पाळेल. विज्ञान युगात हे अमानवी आहे, पण न्यायाचे आहे. ५० वर्षे आमचे उष्टे खा. ब्राह्मणांनी बहुजनांना सुमारे ५००० वर्षे झोडपले. आम्हाला ५०० वर्षे तरी झोडपू द्या.’’ (बहुजनांच्या सत्तातरांचा संघर्ष, पृ. ३६) ही मांडणी सनसनाटी आणि चटकदार असली तरी बुद्ध, कबीर, फुले, बाबासाहेब यांच्या विचारात ती बसणारी नाही. दंगली, कत्तली, अस्पृश्यता, विटाळ यांना आधुनिक भारतीय समाजाने थारा देता कामा नये. हा अतिरेकी, दहशतवादी मार्ग बहुजन तरुणांची माथी भडकावून त्यांना पोलिसांच्या आणि तुरुंगाच्या सापळ्यात अडकवणारा मार्ग आहे. जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने त्याच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांची बदनामी केली आहे. त्याच्या या दुष्टाव्यामुळे सारेच भारतीय दुखावले गेलेत. सर्व भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या या नतद्रष्ट माणसाला खेडेकरांनी त्यांचे दादोजी कोंडदेवांवरील पुस्तक अर्पण केले आहे. खेडेकरांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये जेम्स लेनचे आभार मानलेले आहेत, हा प्रकार म्हणजे भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणे होय. मधुकर रामटेके, संजय सोनवणी, भूपाल पटवर्धन आणि हरी नरके यांनी श्याम सातपुतेंना साथ द्यायचे ठरवले. १८ मे २०११ रोजी आंबेडकरवादी चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते अशोक धिवरे, सहआयुक्त, पुणे पोलीस यांना भेटून लेखी अर्ज व खेडेकरांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकाची प्रत सादर केली. पोलिसांनी योग्य ती छाननी आणि शहानिशा करून सुमारे ३ आठवडय़ांनी खेडेकरांवर गुन्हा दाखल केला. ‘‘प्रशिक्षित मराठा युवकांनी पुढाकार घेऊन देशात धार्मिक व जातीय दंगली घडवून आणल्या पाहिजेत, तरच समाजात सुधारणा, क्रांती व परिवर्तन शक्य आहे. हिटलरशाहीप्रमाणेच ब्राह्मण हाच एकमेव शत्रू व तो नेस्तनाबूत करणे हाच आमचा संकल्प ही प्रतिज्ञा कोरावी लागेल. सर्वच ब्राह्मण पुरुष कापून वा जाळून मारावेच लागतील. महाराष्ट्रासह भारत देश ‘निब्र्राह्मण’ करावा लागेल. हेच खरे शिवप्रेम, हेच खरे शिवकार्य. आज छत्रपती शिवराय पुन्हा आल्यास हेच कार्य करतील.’’ (पृ. ५४, ५५) असा थेट चिथावणीखोर मजकूर खेडेकरांनी लिहिलेला आहे.
२० वर्षांत प्रथमच खेडेकरांना संघटनांतर्गत समर्थक उरलेला नाही. त्यांचे सर्व सहकारी या लेखनाचा निषेध करीत आहेत. संघटनेत उभी फूट पडण्याच्या मार्गावर आहे. जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवधर्म यांना खतपाणी घालून वाढविले आहे. बामसेफचे वामन मेश्राम आणि खेडेकर यांच्यापासून डॉ. साळुंखे यांना दूर का व्हावे लागले, याचे आत्मपरीक्षण कधी तरी त्या दोघांनी केले पाहिजे. नेत्यांच्या सूरात सूर मिसळूनच बोला, नाही तर शत्रू ठरविले जाईल ही वृत्ती अभ्यासकांना कशी मानवेल? या संघटनांचे ‘दै. मूलनिवासी नायक’ नावाचे मुखपत्र चालविले जाते. त्यात गेली २ वर्षे प्रा. रावसाहेब कसबे, प्रा. विलास वाघ, प्रा. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव, प्रा. दत्ता भगत, उत्तम कांबळे, नामदेव ढसाळ, डॉ. सुखदेव थोरात, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राजा ढाले, जोगेंद्र कवाडे, छगन भुजबळ, नागनाथ कोतापल्ले, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, य. दि. फडके, भालचंद्र फडके, गं. बा. सरदार, नरहर कुरुंदकर, बाळकृष्ण रेणके, डॉ. सदानंद मोरे, प्रा. आ. ह. साळुंखे, प्रा. उषा वाघ, प्रा. अंजली आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर आणि इतर अनेकांविरुद्ध मोहीम उघडण्यात आल्या. अत्यंत भडक, धादांत खोटय़ा, चिथावणीखोर आणि विकृत हेडलाइन्स देण्यात आल्या. पानभर मजकूर, अग्रलेख, लेख यांचा भडिमारच करण्यात आला. सगळे वृत्तपत्रीय संकेत पायदळी तुडवून पुन्हा-पुन्हा एकतर्फी अर्धसत्य मजकुरांचा मारा करण्यात आला. कोणाचाही खुलासा छापण्यात आला नाही. फॅॅसिस्ट शक्ती कृतघ्न, खुनशी तसेच व्यक्तिगत वैमनस्य करणाऱ्या असतात, याचा प्रत्यक्ष अनुभव चळवळीतील लोकांना येत गेला. डिवचणाऱ्यांनी डिवचत रहायचे आणि डिवचले जाणाऱ्यांनी गप्प रहावे, अशी अपेक्षा बाळगायची हा प्रकारच क्रूरतेच्या पातळीवर जाणारा आहे. ही कोंडी आणि हे अपमानकारक डिवचणे किती काळ पचवून घ्यायचे? पुस्तिका, पुस्तके, प्रचारपत्रके, उस्मानाबाद, अमरावती, नाशिक येथील खोटय़ा पोलीस तक्रारी यांचा उच्छाद मांडण्यात आला. शेवटी चळवळीतील लोकांच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात. वारंवार विनवणी करूनही हा भडिमार थांबला नाही. अत्यंत गलिच्छ पत्रे पाठवून आणि खेडेकरांच्या फेसबुकवरील ‘शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच’च्या माध्यमातून बदनामी, धमक्या आणि शिवीगाळीचा वर्षांव चालूच राहिला. शेवटी भारतीय राज्यघटनेने चळवळीतील लोकांनाही आत्मसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे.
खेडेकर म्हणतात, ‘‘महाराजांनी रामदासांचे सुमारे सहाशे ब्राह्मण शिवराज्याभिषेकास विरोध करण्यासाठी आले असता उभे कापून काढले. महाराजांनी गोळीबाराचा हुकूम फर्मावला. पटापट शेपाचशे मुडदे पडले. रामदासी संपले. रस्ता मोकळा झाला. राज्याभिषेक समारंभ ब्राह्मण संपल्यावर निर्वघ्निपणे पार पडला.’’
चळवळीतील संशोधन आणि साहित्य राजरोसपणे स्वत:च्या नावावर छापायचे, इतरांना सरसकट शिवराय- फुले- शाहू- अांबेडकर- अण्णाभाऊ विरोधी ठरवायचे, अनुयायांकरवी धाकदपटशा दाखवून मनस्ताप द्यायचा, रात्रीबेरात्री फोनवर धमक्या, भाषणांचे विकृतीकरण आणि वैयक्तिक चारित्र्यहनन करून अपमानित करायचे, छळायचे हे फुले-अांबेडकरी मार्ग आहेत काय? या वर्तनामागे एक तत्त्वज्ञान आहे. खेडेकर त्यांच्या ‘आपली माणसं अशी का वागतात?’ या पुस्तकात म्हणतात, ‘‘नेता हाताबाहेर जातो, असे वाटल्यास जवळचे जपून ठेवलेले त्याचे विरोधातील ‘शिवअस्त्र’ काढावे. सरळसरळ त्याला ‘ब्लॅकमेल’ करून खुंटय़ाला बांधून ठेवावे.’’ (पृ. २७) ब्लॅकमेिलगचे शस्त्र हे फुले अांबेडकरी विचारधारेत बसते काय? चळवळी आणि अंडरवर्ल्ड यात काही फरक असणार की नाही? ‘हुजरेगिरी’ आणि ‘चमचेगिरी’ हा चळवळीचाच भाग समजावा, असे लिहिण्यापर्यंत ज्यांची मजल जाते त्यांचा अध:पात कोण थांबवणार? (आपली माणसं, पृ. २७) चळवळीतील सहकारी काही चिकित्सा करायला लागला की त्याला ब्राह्मणांचा हस्तक, दलाल, गद्दार अशा ठेवणीतल्या शिव्या देऊन त्याचे तोंड बंद करायचा प्रकार केला जातो. खेडेकर आणि मूलनिवासी नायकचे संपादक यांच्या लेखणीने सगळे ताळतंत्रच सोडले आहे. इतिहासाची मोडतोड करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. उच्चवर्णीय इतिहासकारांनी गाय मारली म्हणून बहुजनांनी वासरू मारले पाहिजे काय? खेडेकर विरोधी छावणीच्या लेखनामागील तत्त्वज्ञान उलगडवून दाखवताना म्हणतात, ‘‘मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार एकच बाब सतत सांगत राहिल्यास ती खरी वाटते. (गोबेल्स तंत्र) खोटी गोष्ट भावनेला जोडून सांगितल्यास ती खरी वाटते.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. १०) स्वत: खेडेकर या तंत्राचाच तर वापर करीत असतात.
खेडेकर म्हणतात, ‘‘महाराजांनी रामदासांचे सुमारे सहाशे ब्राह्मण शिवराज्याभिषेकास विरोध करण्यासाठी आले असता उभे कापून काढले. महाराजांनी गोळीबाराचा हुकूम फर्मावला. पटापट शेपाचशे मुडदे पडले. रामदासी संपले. रस्ता मोकळा झाला. राज्याभिषेक समारंभ ब्राह्मण संपल्यावर निर्वघ्निपणे पार पडला.’’ (‘आपली माणसं’ अशी का वागतात? पृ. १७) ते पुढे म्हणतात, ‘‘रामदासाने आदिलशहासमोर शपथ घेतल्याप्रमाणे जिजाऊ, शिवराय, संभाजी व राजाराम यांचे खून केले.’’ (महाराज माफ करा, पृ. २५) ‘‘श्रीकृष्ण हा स्त्रीउद्धारक होता.. श्रीकृष्ण हा समतेचे, न्यायाचे प्रतीक आहे. तर विष्णू हा विषमतेचे, अन्यायाचे प्रतीक. श्रीकृष्ण बहुजनांचा तर विष्णू ब्राह्मणांचा! जातिनिर्मूलनासाठी श्रीकृष्णाने सर्व जातबांधवांच्या शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा काला तयार केला’’ (मराठय़ांचे रामदासीकरण, पृ. १९) असे खेडेकरांचे संशोधन आहे. रिडल्स ऑफ राम अॅण्ड कृष्ण लिहिणाऱ्या आणि रामकृष्णांचे गौडबंगाल उलगडून दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी खेडेकरांची ही मते काडीमात्र जुळत नाहीत. किंबहुना ती पूर्णपणे विरोधात जातात. तरीही खेडेकर आंबेडकरवादी आहेत असे कसे म्हणायचे? शिवरायांनाही वेठीला धरताना शिवरायांच्या तोंडी ते चक्क काल्पनिक मजकूर घालतात. ते म्हणतात, ‘‘शिवराज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टाने महाराजांना प्रायश्चित्त घेण्यासाठी यज्ञ करावा लागेल असे सांगितले. तेव्हा महाराजांना त्यांनी प्रत्येक ब्रह्महत्येमागे आठ हजार होन दक्षिणा मागितली. महाराज म्हणाले, ‘ब्रह्महत्या म्हणून प्रत्येकी आठ हजार होन द्यायला मी तयार आहे. पण एक करा, सध्या जिवंत असलेल्या भटांचीही मोजणी करा, त्यांनाही संपवून टाकू. त्याबद्दल प्रत्येकी आठ हजार होन देऊन टाकू. गागाभट्ट चरकला. महाराजांचे हे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी शिवभक्तांवर येऊन पडली आहे. त्यासाठी शिवभक्तांनी तयार राहावे.’’ (ब्राह्मण राष्ट्राचा बुरखा हिंदू राष्ट्र, पृ. १९) असे खेडेकरांचे हिंसक प्रतिपादन आहे. यातून हे स्पष्ट होते की, खेडेकर बिनदिक्कतपणे शिवरायांना वेठीला धरून स्वत:च्या हिटलरी विचारांचा प्रचार करीत आहेत.
खेडेकरांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा वाईट आहेत. खेडेकर म्हणतात, ‘‘औरंगजेब बादशहाने बापाला तुरुंगात टाकून मारले. पण बापाच्या वंशाच्या विचारांचे राज्य देशाबाहेरही विस्तारीत केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बापाला शेवटपर्यंत जिवंत ठेवले, परंतु त्यांच्या विचारांची राजरोस हत्या करून महापाप केले आहे. शारीरिक हत्या ही राज्यकारभारात क्षम्य असते. परंतु सामान्य जनतेच्या उत्थानासाठी असलेली विचारधारा नष्ट करणे यास क्षमा नाही. या मापदंडानुसार बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा जास्त अपराधी ठरतात. कारण त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना रामदासांच्या दावणीला बांधली. आपल्याच बापाशी प्रतारणा करणारे बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख आहेत.’’ (बहुजनहिताय, पृ. २७) बाळासाहेब ठाकरेंना सुनावताना खेडेकर म्हणतात, ‘‘ठाकरे, आमच्या मातेऱ्यावर तुमचे पूर्वज पोसलेत व तुम्ही करोडपती झालात.’’ (पृ. ३३) ठाकरेंची शिखांच्या विरोधात बोलण्याची िहमत नाही असे खेडेकरांना वाटते. ‘‘शिखांच्या विरोधात बोलल्यास इंदिरा गांधींसारखे मरावे लागेल. बाळासाहेब ठाकरी भाषेत यावर एकदा बोलाच’’ (पृ. ४१) अशा शब्दांत ते बाळासाहेब ठाकरे यांना चॅलेंज करतात. खेडेकरांचे अजब तर्कशास्त्रच कुठूनही कुठे जात असते. ते म्हणतात, ‘‘आज लोकशाही नसती तर नारायण राणे, राज ठाकरे अशा अनेक मर्दानी बाळ ठाकरे, मनोहर जोशी यांच्या हत्या याच तत्त्वानुसार केल्या असत्या. इत:पर आजही ठाकरे कुटुंबातीलच मीनाताई ठाकरे वा िबदुमाधव ठाकरे या मायलेकांच्या मृत्यूचे गूढ उकलले नाही.’’ (बहुजन हिताय, पृ. २१) शिवसनिकांनी हे सारे वाचलेले नसणार. त्यांनी हे साहित्य काळजीपूर्वक वाचून त्यावर खेडेकरांशी चर्चा केली पाहिजे.
खेडेकर राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावरही टीका करतात. ते म्हणतात, ‘‘आज संपूर्ण देशात एकाही राजकीय पक्षावर मराठी नेतृत्वाचा अंकुश नाही. एकाही पक्षाचा प्रमुख कुणबी-मराठा नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष कुणबी शरद पवार आहेत. पण सत्यशोधकी आई शारदाबाईंचे संस्कार त्यांनी शंकराचार्याच्या चरणी वाहिलेत.’’ (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. २५) मराठा स्त्रियांबद्दल खेडेकरांच्या मनात नेमक्या काय भावना असाव्यात? ते म्हणतात, ‘‘पुरुषार्थ हाच जगातील सर्व समाजांमध्ये पुरुषाचा अलंकार समजला जातो. शुद्ध व बीजधारी वीर्य हेच पुरुषांसाठी सर्वकाही असते.. पुरुषाचा पुरुषार्थ हा त्याच्या सहकारी स्त्रीचे पूर्ण लंगिक समाधान करण्यात असतो.. आपली मादी आपल्याच ताब्यात राहावी व आपणच भोगावी यासाठी जनावरे मरणही पत्करतात; परंतु जिवंतपणी आपली मादी इतर कुणी भोगत असल्याचे पाहू शकत नाही.. गावातील एखाद्या सुंदर कुत्रीच्या पाठीमागे अनेक कुत्रे असतात, पण ती इतरांना हुंगतही नाही. एखादा बलदंड कुत्रा तिची कामेच्छा पूर्ण करण्यात पुढाकार घेतो.. आपली सुंदर, तरुण, भरगच्च भरलेली बायको कोणाशी साधी लगट करताना दिसली तरी मराठा बहुजन आकांडतांडव करतो. आपल्या देखण्या बायकोवर सोबतचे लोक लाइन मारतील एवढय़ा साध्या कल्पनेनेही मराठा पुरुष आपल्या रूपवान तरुण बायकोला सार्वजनिक कार्यक्रमांना नेत नाहीत.’’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ३४, ३५) मराठा स्त्रियांच्या विशेषत: जिजाऊ ब्रिगेडच्या माताभगिनींच्या प्रतिक्रिया या लेखनाबाबत कळल्या तर बरे होईल. हे लेखन मराठा समाजातील स्त्री-पुरुष या दोघांचीही बदनामी करणारे नाही काय? तसेच या पुस्तकात इतरत्र मराठा पुरुषांचे चित्रण पुरुष वेश्या म्हणून सरसकट करण्यात आले आहे, हा लढवय्या मराठा पुरुषांचा अपमान नाही काय? आपण काहीही लिहिले किंवा बोललो तरी मराठा समाज निमूटपणे त्यावर विश्वास ठेवील अशी खेडेकरांना खात्री आहे. त्यांची मदार तरुण पिढीची ऊर्जा, हिटलरी आदर्शवाद, ओबीसी विरोध, दुषित पूर्वग्रह आणि माथेफिरूपणा यावर आहे. फुले-आंबेडकरी विचारधारेला त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणाची कळा आणली आहे. हे चालवून घ्यायचे काय?
खेडेकरांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा वाईट आहेत. खेडेकर म्हणतात, ‘‘औरंगजेब बादशहाने बापाला तुरुंगात टाकून मारले. पण बापाच्या वंशाच्या विचारांचे राज्य देशाबाहेरही विस्तारीत केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बापाला शेवटपर्यंत जिवंत ठेवले, परंतु त्यांच्या विचारांची राजरोस हत्या करून महापाप केले आहे.
खेडेकर बहुजन समाजाने यशस्वी क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आदर्श नेते आणि विचारवंत यांच्या मार्गाने जाण्याचा सल्ला देतात. (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ३१) त्यांनी दिलेल्या महापुरुषांच्या व विचारवंतांच्या ६८ जणांच्या यादीतील २६ जण दिवंगत झालेले आहेत. ४२ विद्यमान प्रबोधनकारांमध्ये खेडेकरांनी कोणाकोणाचा समावेश केलेला आहे हे बघणे उद्बोधक ठरेल. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी कर्त्यां लोकांची यादी केली होती. त्यात म. फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, ताराबाई शिंदे आदींचा समावेश नव्हता. खेडेकरांच्या या यादीतील हयात ४२ जणांपकी ३४ जण हे सत्ताधारी मराठा किंवा कुणबी जातीतील आहेत. २ बौद्ध आहेत. २ मुस्लीम आहेत. उर्वरित सर्व दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, ओबीसीतून खेडेकरांनी अवघे ४ जण घेतलेले आहेत. या यादीत धनगर, माळी, वंजारी, आग्री, भंडारी, कुंभार, चर्मकार, साळी, न्हावी, िशपी आदी समाजातून एकालाही स्थान मिळालेले नाही. ज्यांचे अनुकरण करणे म्हणजे फुले-अांबेडकरी विचाराचा प्रचार, प्रसार करणे अशी खेडेकरांची धारणा आहे त्या यादीची ही अवस्था आहे. या यादीत न्या. पी. बी. सावंत, शरद पाटील, रावसाहेब कसबे, भालचंद्र मुणगेकर, डॉ. जनार्दन वाघमारे, गोिवद पानसरे, एन. डी. पाटील, सदानंद मोरे, डॉ. बाबा आढाव, उत्तम कांबळे, रझिया पटेल, सय्यदभाई, लक्ष्मण माने, एकनाथ आव्हाड, बाळकृष्ण रेणके, महादेव जानकर, श्रावण देवरे, प्रदीप ढोबळे, हनुमंत उपरे, बाबुराव गुरव, लक्ष्मण गायकवाड, राजा ढाले, गेल ओम्वेट, सुनील सरदार, शाम मानव, सुखदेव थोरात अशा बहुजनातील कोणालाही स्थान नाही. फुले-आंबेडकरी चळवळीला आपला मतदारसंघ समजून तेथील आधीपासूनच्या नेत्यांना हाकलू पाहणारे खेडेकर कोणाला फुले-अांबेडकरवादी मानतात ते स्पष्ट होते. खेडेकर मुळात जाती निर्मूलनवाले नसून जात्योन्नतीवादी आहेत, हा प्रा. श्रावण देवरे यांचा दावा योग्यच आहे. खेडेकरांना फुले-अांबेडकरी चळवळीत घुसखोरी करून ती चळवळ हायजॅक करायची आहे. त्यासाठी मूळच्या चळवळवाल्यांस बदनाम करणे किंवा त्यांना हद्दपार करणे यावर त्यांचा भर आहे. त्यांचा आराखडाच त्यांनी आपल्या एका पुस्तकात दिला आहे. ‘‘आपले काम सिद्धीस नेण्यासाठी प्रसंगी शत्रूबरोबरही मत्रीचे नाटक करावे लागते. ते तुम्ही करा.. तुमची ताकद कावेबाजपणे वाढवा.. योग्य वेळ येताच आपल्या कपटनीतीचा अवलंब करून (राक्षस) समाजावर हल्ला करावा.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ५८) खेडेकर हा उपदेश विष्णूचा म्हणून सांगत असले तरी मुळात तो स्वत:च्या अनुयायांना व सत्ताधाऱ्यांना खेडेकरांनी केलेला उपदेश आहे. फुले-अांबेडकरी चळवळ कशी ताब्यात घ्यायची याचा तो मूलमंत्रच आहे. खेडेकरांचे फुले-अांबेडकरी प्रेम अस्सल आहे की तो त्यांचा मुखवटा आहे याचा शोध त्यांच्याच लेखन आणि कृतींच्या आधारे घेता येतो. ब्राह्मण समाजाबाबतचे त्यांचे आक्षेप हे ‘शिवाजी महाराज व ब्राह्मण’ याऐवजी ‘फुले-अांबेडकर व दलित-ओबीसी’ असे लावून बघा. खेडेकर म्हणतात, ‘‘आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्वात जास्त ब्राह्मणच दिसतात. प्रत्यक्षात ब्राह्मणांना शिवाजीबद्दल प्रेम नाही. तर त्यांना बहुजन समाजाच्या मनावर शिवरायांच्या नावाची असलेली पकड वापरावयाची आहे. ब्राह्मणांना शिवचरित्राचे विकृतीकरण करावयाचे आहे.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ९७) खेडेकरांनी फुले-अांबेडकरांच्या साहित्याचे जे विकृतीकरण चालविले आहे त्यातून त्यांचा छुपा अजेंडा उघडा पडतो.
महात्मा फुले यांचे साहित्य उद्धृत करताना खेडेकर लिहितात, ‘‘जोतिबांनी सर्वप्रथम परशुराम या ब्राह्मणाच्या बापास सरळ नोटीस पाठवून आमच्या पूर्वजांवर केलेल्या अन्याय-अत्याचाराचे व हत्या या बाबत तुझ्या विरोधात (म्हणजेच आजच्या तुझ्या वंशजांच्या विरोधात) आम्ही हत्यासत्र ही कारवाई का करू नये, अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस बजावली’’ (महाराज, माफ करा, पृ. ३४) प्रत्यक्षात ‘हत्यासत्र’ हा शब्द महात्मा फुल्यांच्या नोटिशीमध्ये नाही. तो खेडेकरांनी पदरचा घातला आहे. स्वत:च्या अविचारी मतांचा प्रचार करण्यासाठी ते फुल्यांना वेठीला धरीत आहेत. फुल्यांना हत्यासत्रांचे पुरस्कर्ते आणि माथेफिरू ठरवण्याचा हा निंदनीय प्रकार आहे. जोतिरावांनी दि. १ ऑगस्ट १८७२ रोजी परशुरामाला जाहीर नोटीस दिली होती. ‘‘तू चिरंजीव असशील तर सहा महिन्यांत येऊन हजर हो,’’ असा मजकूर या नोटिशीत होता. (पाहा- महात्मा फुले समग्र वाङ्मय २००६, पृ. १७१). त्यात हत्या किंवा हत्यासत्र असा उल्लेखच नाही. स्वत:च्या दंगली, कत्तली आणि हत्यासत्रांच्या हिटलरी विचारसरणीच्या प्रचारासाठी खेडेकर महात्मा फुल्यांच्या साहित्यामध्ये बदल करण्याचा हा जो उद्योग करीत अहेत, त्यामुळे त्यांची विश्वासार्हताच संपुष्टात येते.
‘‘आपली सुंदर, तरुण, भरगच्च भरलेली बायको कोणाशी साधी लगट करताना दिसली तरी मराठा बहुजन आकांडतांडव करतो. आपल्या देखण्या बायकोवर सोबतचे लोक लाइन मारतील एवढय़ा साध्या कल्पनेनेही मराठा पुरुष आपल्या रूपवान तरुण बायकोला सार्वजनिक कार्यक्रमांना नेत नाहीत.’’
फुल्यांनी ब्राह्मण मुलींसह सर्व स्त्रियांसाठी शाळा काढल्या. ब्राह्मण विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधकगृह’ काढले. एक ब्राह्मण मुलगा दत्तक घेतला. त्याच्या नावे मृत्युपत्राद्वारे आपली सगळी स्थावर-जंगम मालमत्ता केली. ‘ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणांशी धरावे पोटाशी बंधुपरी’ (महात्मा फुले समग्र वाङ्मय, पृ. ५६९) म्हणणाऱ्या फुलेंना ब्राह्मणद्वेष्टय़ा म्हणून रंगविण्यासाठी खेडेकरांनी ‘भटोबाचा कर्दनकाळ जोतिबा’ ही पुस्तिका लिहिली. नांगराचा फाळ ब्राह्मणाच्या पोटात खुपसून जोतिराव ब्राह्मणाची हत्या करीत आहेत असे चित्र मुखपृष्ठावर दाखविले. फुल्यांनी ब्राह्मणवादावर टीका केलेली आहे. त्यांची टीका तळमळीतून आलेली होती, द्वेषातून नाही. त्यामागे व्यक्तिद्वेष नव्हता. त्यांचा विरोध प्रवृत्तीला होता. खेडेकरांना वैयक्तिक आणि पक्षीय स्वार्थासाठी कत्तली, दंगली, िहसाचार घडवायचा आहे, त्यासाठी फुले वापरावयाचे आहेत. या कामात जे कोणी आडवे येतील त्यांना खेडेकर झोडपतात. छगन भुजबळ, महादेव जानकर आणि रावसाहेब कसबे यांना फुलेविरोधी ठरवायचे आहे. फुल्यांचे बालपणापासूनचे मित्र भांडारकर यांचे फुल्यांनी ‘शिवाजी महाराजांच्या पोवाडय़ात’ जाहीरपणे आभार मानले. ‘‘हा पोवाडा एकंदर तयार करतेवेळी माझे लहानपणीचे मित्र भांडारकर यांनी इतर दुसऱ्या लोकांसारख्या पायात पाय न घालता मला या कामात नेहमी िहमत देऊन वारंवार माझ्या कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे.’’ (म.फु.स.वा, पृ. ४४) असे कृतज्ञतेने १८६९ साली नमूद करणाऱ्या फुल्यांनी आपल्या या जिवाभावाच्या नि आयुष्यभराच्या मित्राची स्वत:च्या मृत्युपत्रावर १८८७ साली साक्ष घेतलेली आहे. (म.फु.स.वा., पृ. ६४८) साक्षीदार म्हणून जवळच्याच व्यक्तीची निवड केली जाते ना? याच मृत्युपत्राचा खेडेकर ब्राह्मणद्वेषासाठी सतत वापर करीत असतात. सदर मृत्युपत्राची अस्सल प्रत मी स्वत: सह जिल्हानिबंधक पुणे, (मध्यवर्ती अभिलेख) कार्यालयातून शोधून काढून फुले समग्र वाङ्मयात छापलेली आहे. मृत्यूनंतर करावयाचे विधी फुलेंना भटजीऐवजी सत्यशोधक पद्धतीने करायला हवे होते. त्याची नोंद करताना तेथे भटजी नको असे फुले लिहितात. त्यातही ‘शूद्रातिशूद्रांना दासानुदास मानणाऱ्या’ भटजींना फुले प्रवेश वर्जति करतात. तथापि, खेडेकर मात्र या मजकुराचा गरवापर करून फुल्यांचे विद्वेषवादी चित्रण करीत असतात. खेडेकर म्हणतात, ‘‘छगन भुजबळ यांनी जोतिरावांचे मृत्युपत्र मुळातच वाचावे. त्यांनाच ब्राह्मणांचा जास्त पुळका आहे.. आम्ही ब्राह्मणद्वेष वाढवतो असे भुजबळांचे गरसमज आहेत. ते दूर होण्यासाठी त्यांनी जोतिबांचे पूर्ण साहित्य वाचावे. नंतर समता सांगावी.’’ (आपली माणसं, पृ. २०) खेडेकरांच्या क्लृप्त्या उघडय़ा करणाऱ्यांना ते ‘भटाळलेला’ अशी पेटंट शिवी देत असतात. ते म्हणतात, ‘‘बहुजन समाजातील भटाळलेला, शिकलेला माणूस हा कट्टर ब्राह्मणापेक्षा धोकादायक असतो.’’ (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ४) एवढेच नाही तर असे लोक हे आपले शत्रू आहेत. अशी शिकवण ते अनुयायांना देतात. ‘‘आपली लढाई कट्टर, जात्यंध, कर्मठ ब्राह्मणशाहीविरुद्ध आहे. तशीच आपल्या बहुजन समाजातील ब्राह्मणशाहीचे हस्तक व गुलाम झालेल्या बहुजनांविरुद्धही आहे.’’ (पृ. २४) खेडेकरांचे आदर्श मुळातच हिटलर व औरंगजेब हे असल्याने त्यांना चर्चा, चिकित्सा किंवा मतभेद मान्यच नसतात. वेगळ्या सुरात बोलणारा प्रत्येक माणूस आपला शत्रूच आहे अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे सोबत काम केलेल्या कुणालाही ते रातोरात शत्रू घोषित करून मोकळे होतात. खेडेकर आत्मकेंद्रित आणि ‘नार्सििसस्ट’ आहेत. त्यांचे फक्त स्वत:वरच प्रेम आहे. जबर महात्त्वाकांक्षा आणि उतारवयामुळे येत असलेले नराश्य यातून ते अधिकाधिक अतिरेकी बनत चालले आहेत. ते म्हणतात, ‘‘सध्या संभाजी ब्रिगेडची वाटचाल याच दिशेने चालू आहे. (असे कधीच न सुटणारे प्रश्न मरेपर्यंत वा आम्ही थकेपर्यंत चालवत असतो. आमची क्षीण होत जाणारी ताकद व शरीरयष्टी नेते पाहत असतात.) संभाजी ब्रिगेडचे अनेक नेते व कार्यकर्ते गळाला स्वत:च्या माना टांगून लटकावून आहेत. त्यांच्या तोंडात मासा पडण्याची शक्यता कमी आहे. हे सगळे मला दिसते. पण माझी अवस्था तरुण व सुंदर बायको असणाऱ्या हाडकुळ्या बामणासारखी झाली आहे.’’ (आपली माणसं अशी का वागतात, पृ. २७) खेडेकरांचा हा कबुलीजबाब स्वयंस्पष्ट आहे. त्यावर कोणतीही टिप्पणी करायची गरजच नाही. सत्ताधारी नेत्यांनी आपला वापर केल्याची आणि फसवणूक केल्याची खंत त्यांच्या लेखनातून अनेकदा व्यक्त होते. ‘‘आमच्या पुढाऱ्यांनी व आमच्या नेत्यांनी आमच्या चळवळीची अंतर्बाह्य़ सर्वच मापे जुळवलेली आहेत.. चळवळीचे नेते विकत घेतले जाऊ शकतात, हे ते सिद्ध करत असतात.. नेते जातीने आपले असतात, मतीने असतातच असे नाही. आणि आतातर आपली औकातच त्यांना माहीत आहे. आपणच त्यांना पुढे होऊन वाकून ‘जय जिजाऊ’ करतो, अस्मिताच मेली!’’ (आपली माणसं, पृ. २५, २६) ही खेडेकरांची व्यथा आहे की आत्मकथा? अपयश, अपराधगंड आणि मानसिक असंतुलन यांचा पगडा खेडेकरांच्या अलीकडच्या सर्वच लेखनावर जाणवतो.
(क्रमश:)harinarke@yahoo.co.in |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा