http://satyashodhak.com/2011/08/19/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/
हरी नरकेंचा कांगावा..
लोकप्रभाच्या दि. ५ ऑगस्टच्या अंकात ‘फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन’ हा हरि नरके यांचा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की, एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी चळवळ बदनाम करण्यासाठी कोणतं तंत्र वापरावं, तर ते हरि नरके यांनी शोधलेलं आणि या लेखात वापरलेलं तंत्र होय. संपूर्ण लेखात ते पुरुषोत्तम खेडेकर, त्यांच्या मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांवर ना ना आरोपांचे लेपन करताना आढळतात. आणि हे आरोप तरी कसे, तर वस्तुस्थिती लपवून, संदर्भ सोडून आणि मजकुराच्या आशयाची नरकेंना पाहिजे तशी मोडतोड करून.
‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकाविरुद्ध नोंदविलेल्या गुन्ह्याबद्दल नरके लेखात माहिती देतात. परंतु ती देताना ती स्वत:च्या अंगलट येणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. पुस्तकाविरुद्ध तक्रार करणारे शाम सातपुते हे मराठा असल्याचं आवर्जून लिहिणारे नरके, शाम सातपुते हे गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, ते भाजपचे नगरसेवकदेखील होते, इतकेच नाही; तर बदनाम भांडारकर संशोधन संस्थेच्या नियामक मंडळात हरि नरकेंच्या मांडीला मांडी लावून बसणारे तेदेखील एक सदस्य आहेत, ही सातपुतेंबद्दलची पूरक माहिती दडवून का ठेवतात? की, ती वाचकांसमोर ठेवली असती, तर स्वत:ला पुरोगामी म्हणविणार्या नरकेंची अडचण झाली असती?
आता ज्या पुस्तकातील मजकुरावरून हरि नरकेंचा सात्विक संताप उफाळून आला, त्या पुस्तकाबद्दल. पंच्चावन्न पानांच्या त्या पुस्तकात अवघा पाऊण पानाचा मजकूर वादग्रस्त मानला जातो. स्वत: खेडेकरांनी तो नाकारलेला नाही किंवा त्याबद्दल पश्चाताप व्यक्त केलेला नाही. ते एक प्रकारचे प्रतिक्रियात्मक लेखन आहे. ब्राह्मणी जातीयवादी साहित्यात बहुजन स्त्रियांबद्दलच्या अपमानास्पद मजकुराविरोधात खेडेकरांनी लिहिलेला तो पुस्तकातील मजकूर आहे. ब्राह्मणी स्त्रियांबद्दल लिहिल्याबद्दल नरकेंना संताप येत असेल, तर जातीयवादी ब्राह्मणी साहित्यात ब्राह्मणेतर वर्णीयांच्या स्त्रियांबद्दल जो बीभत्स, अपमानास्पद मजकूर आजही उपलब्ध आहे, त्याबद्दल त्यांनी अगोदर ब्राह्मणी जातीयवादी छावणीला जाब विचारला पाहिजे. प्रसंगी त्या विरोधात लढा उभारायला पाहिजे.
परंतु नरक्यांची आजची अवस्था ‘बाटग्याला धर्माभिमान फार’ अशी झाली आहे. आपली मूळची पुरोगामी वैचारिक छावणी सोडून ते जातीयवादी फॅसिस्टांच्या छावणीचे रखवालदार बनले आहेत. साहजिकच, ‘नवब्राह्मणा’ची भूमिका बजावताना त्यांना वारंवार आपल्या निष्ठेची पावती ‘जातीयवादी’ बॉसना द्यावी लागते. ब्राह्मण साहित्यातील स्त्री-उपमर्दाबद्दल प्रतिगाम्यांना जाब विचारण्याचं सोडून, खेडेकरांच्या लेखाबद्दल आकाश कोसळल्यासारखं ते जे वागत आहेत, ते त्यापोटीच.
याच लेखात नरके खेडेकरांबद्दल स्वत:च्या चष्म्यातून पाहिलेली माहिती वाचकांसमोर ठेवतात. तिचा उद्देश खेडेकरांबद्दल निव्वळ गैरसमज पसरविण्याचा आहे. अर्धवट माहिती, त्यावर स्वत:च्या मनाची टीकाटिप्पणी आणि दिशाभूल करणारी वाक्यं यातून नरकेंना काय साध्य करायचं होतं? त्यासंदर्भात नरके खेडेकरांबद्दल रोखठोक का लिहीत नाहीत? खेडेकरांनी शासकीय कर्मचार्यांची संघटना काढली, यात नरकेंना खटकण्यासारखं काय वाटतं?
वीस वर्षांपूर्वी मराठा सेवा संघ स्थापन करताना खेडेकर जेथे होते, तेथेच ते आजदेखील उभे आहेत. ब्राह्मणी जातीयवादी वर्चस्ववादाविरुद्ध असलेले त्यांचे विचार पूर्वीइतकेच आजदेखील ठाम आहेत. आणि त्यात बदल होण्याची शक्यता नाही. त्यांचे विचार रोखठोक, स्पष्ट असतात. नरकेंसारखा बोटचेपेपणा, स्वार्थ किंवा लांगुलचालन करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ ही त्यांची श्रद्धास्थानं, तर फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार त्यांची प्रेरणा आहे. त्यांच्या स्पष्ट आणि आक्रमक लिखाणामुळे हजारो मराठा कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी त्यांच्यासोबत उभी राहिली आहे आणि तीच खेडेकरांची ऊर्जा आहे.
आता हरि नरके खेडेकरांविरुद्ध कंठशोष का करतात, तेदेखील पाहिलं पाहिजे. नरकेंच्या वर्तनाचा मागोवा घेण्यासाठी थोडी पाश्र्वभूमी समजावून घ्यावी लागेल. हरि नरकेंनी कितीही नाकारलं तरी त्यांना सार्वजनिक व्यासपीठावर लोकांसमोर येण्यासाठी बामसेफ आणि मराठी सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेड या संस्था संघटनांचाच आधार घ्यावा लागला. ‘बामसेफ’नं तर त्यांना व्याख्यानं आणि अभ्यासासाठी स्वखर्चानं परदेशातही पाठविलं. मराठा सेवा संघानंदेखील अनेक कार्यक्रमांतून त्यांना लोकांसमोर येण्याची संधी दिली.
या सर्व आठ-दहा वर्षांच्या काळात हरि नरकेंची दोन्ही संघटनांबद्दल काही तक्रार नव्हती, किंवा त्यांच्या ध्येयधोरण आणि कार्यक्रमांबद्दलही नरकेंचा विरोध नव्हता. तोपर्यंत दोन्ही संघटना त्यांच्या दृष्टीने पुरोगामी आणि बहुजनवादी होत्या. परंतु मराठा सेवा संघानं मराठयांसाठी आरक्षणाची मागणी केली अन् पुरोगामी अन् बहुजनवादी म्हणविणारे हरि नरके बिथरले. अन् मराठयांना शिव्याशाप देऊ लागले. मराठयांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करू लागले. वृत्तपत्रातून त्या विरोधात लेख लिहू लागले. आणि खेडेकरांमधील दोषही त्यांना बहुधा याचवेळी दिसू लागले.
ओबीसी वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठे आरक्षण मागत असतील, तर त्यांना विरोध करण्याचं नरकेंना काय कारण? ते स्वत:ला पुरोगामी अभ्यासक म्हणवतात, तर मूठभर सरंजामदार मराठा वर्ग सोडला तर ग्रामीण भागात हजारोंच्या संख्येत आत्महत्या करणारा गरीब, मागास मराठा त्यांना आरक्षणपात्र वाटत नाही. पण हे वास्तव ध्यानी घेऊनही सामाजिक सौहार्दासाठी नरकेंनी त्यांचा विरोध सोडला नाही. उलट, ते समस्त मराठयांचीच आरक्षणाच्या मुद्यावरून खिल्ली उडवू लागले.
याच सुमारास नरकेंचे राजकीय बॉस छगन भुजबळ यांनी डोंबिवली येथे एका भाषणात ‘ब्राह्मणांनी महात्मा फुलेंचा छळ केला नाही’ असं जाहीरपणे सांगून ब्राह्मणी छावणीशी हातमिळवणी करण्याचा संकेत दिला. नरकेंचे राजकीय बॉस अशा रीतीने ब्राह्मण शरण बनल्यामुळे हरिभाऊंनाही त्याच मार्गानं जाणं आलं. त्यातून मग ते नवनव्या ‘मराठा’ विरोधी समीकरणांना जन्म देऊ लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘माधवं’ सूत्राचा मराठयांविरुद्ध वातावरणनिर्मितीसाठी वापर करू लागले. ब्लॉगवर ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद संपला. आता महाराष्ट्रात मराठे-मराठेतर वाद पेटणार’ अशी कुडमुडी भाकितंही करू लागले.
जेम्स लेन प्रकरणी महाराष्ट्रातील वातावरण प्रक्षुब्ध बनलं असता ‘जिजाऊंच्या प्रतिष्ठेसाठी अशा एक नाही तर हजार भांडारकर संस्था जाळाव्या लागल्या तरी जाळू’ असं म्हणणारे पुरोगामी हरि नरके, नुकत्याच घडलेल्या पुण्यातील दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी ब्राह्मणांची वकिली करताना मात्र कसे प्रतिगामी बनले, हे चळवळीतील कार्यकर्ते विसरलेले नाहीत. आपल्या लेखासाठी नरकेंनी पुस्तकाची निवड स्वत:च्या सोयीनं केली आणि फॅसिस्ट तंत्रानुसार संपूर्ण पुस्तकातील एक-दोन वाक्य घेऊन त्याच्यातून स्वत:ला सोयीचे वाटतील असे अर्थ काढून खेडेकरांविरुद्ध राळ उडविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामागे विचारांपेक्षा नरकेंचा विकारच अधिक आढळतो, हे खेदजनक आहे.
एके ठिकाणी नरके लिहितात, ‘हिटलरशाहीप्रमाणेच प्रतिज्ञा मराठा व बहुजनांच्या मनावर कोरावी लागेल. विचारांच्या लढाईला दणक्यांची जोड पाहिजेच. म्हणून भांडारकर तो झाँकी है, या ब्रिगेडनं दिलेल्या नार्याचा अर्थ समजावून घ्या.’ एवढं लिहून नरके पुस्तकातील बाकीच्या आशय-संदर्भाला बगल देऊन खेडेकरांचा आदर्श हिटलर असल्याचं जाहीर करतात. खेडेकरांनीच तशी कबुली दिल्याची फोडणीही ते न विसरता देतात. संदर्भ सोडून वा जे गृहित धरता येत नाही ते गृहित धरून खेडेकरांवर एकतर्फी आरोपपत्र ठेवण्याचा अधिकार नरके स्वत:कडे कशाच्या आधारावर घेतात?
त्याच परिच्छेदात ते अॅड. रूपवते यांच्याबद्दल अकारण जिव्हाळा दाखवितात अन् खेडेकरांना इशारा देतात. का, तर अॅड. संघराज रूपवते हे दादासाहेब रूपवतेंचे चिरंजीव आहेत, आणि दादासाहेब यांना डॉ. आंबेडकरांचा सहवास लाभला, असा बादरायण संबंध ते आंबेडकरवादाशी जोडतात. वास्तविक, अॅड. संघराज रूपवतेंनी जेम्स लेन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ब्राह्मणी जातीयवादी छावणीच्या बाजूनं बाजू मांडणं, हेच गर्हणीय होते. एका अर्थी ती बहुजन विघटनाला मिळणारी साथ ठरेल, असं खेडेकरांचं म्हणणं. त्या विचारातून त्यांनी पुस्तकात स्वत:चं मत व्यक्त केलं. मात्र, त्यांचंही भांडवल नरकेंनी केलं आणि खेडेकरांविरुद्ध गरळ ओकली.
संपूर्ण लेख वाचल्यानंतर हरि नरकेंना खेडेकरांची वा पर्यायानं मराठाद्वेषाची कावीळ झाल्याचं स्पष्ट दिसतं. फुटकळ वाक्य घेऊन त्यातून त्यांनी आकाश कोसळून पडल्यासारखे अर्थ काढले आहेत. अर्थात, लोकांना भडकावण्याचा मनसुबा ठेवूनच त्यांनी लेख लिहिला आहे, हे देखील लपून राहात नाही. आंबेडकरवादी काय, ठाकरे काय, हिटलर काय, पवार काय, ब्राह्मण काय.. खेडेकरांविरुद्ध जेवढ्यांना म्हणून चिथवता येईल, तितक्यांना चिथावण्याचा त्यांनी मुद्दामहून प्रयत्न केलेला दिसतो. अर्थात तीव्र द्वेष वा सूडभावना मनी ठेवून लिहिल्यावर त्यांना यापेक्षा वेगळं काय लिहिता येणार होतं?
आंबेडकरांविरुद्ध आजही कुजबूज मोहीम चालवून त्यांची बदनामी करणारा एक वर्ग समाजात आहेच ना? आदरणीय बाबासाहेबांबद्दल खेडेकरांनी ‘बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकात लिहिलं : ‘महार समाजानं ब्रिटीशांना मदत केली याचा प्रचंड राग ब्राह्मणांना आहे. पुढं इंग्रज भारतातून गेल्यावर ब्राह्मणांनी गांधी हत्या घडवून आणली. परंतु डॉ. आंबेडकर या महारानं देशाची समतावादी राज्यघटना लिहून ब्राह्मणांच्या हक्क-अधिकारांवर गंडांतर आणलं, म्हणून ब्राह्मणांनी डॉ. आंबेडकरांची हत्या घडवून आणली.’ खेडेकरांनी लिहिलं यात नरकेंनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे? महार पलटणींनी इंग्रजांना सहकार्य करून भीमा-कोरेगावच्या लढाईत पेशवाईचा खेळ संपवला, हा इतिहास आहे. त्यांनी इंग्रजांना सहकार्य का केलं याचं सोशियो ऑडिट हरि नरके करतील तर बरेच होईल.
तथापि, नरकेंच्या कुचाळक्या इथंही दिसून येतात. लेखातील मजकुराचा आशय वा संदर्भ याकडे दुर्लक्ष करून ते ‘खेडेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम जातीवाचक उल्लेख करण्याची काय गरज होती, तेच कळत नाही.’ असं आगलावं वाक्य लिहितात. डॉ. आंबेडकरांच्या कार्याचं दोन वाक्यात यथार्थ मूल्यमापन करणार्या खेडेकरांचा त्यांच्याबद्दल असणारा जिव्हाळा अन् नरकेंसारख्या ‘नवब्राह्मणाच्या’ डोक्यातील विकृत जातीयवादी विचार, यातून नरकेंचा रोख कुणाच्याही लक्षात यावा.
व्यक्तिगत द्वेषाची कावीळ झालेले हरि नरके मराठा सेवा संघात फूट पडावी, यासाठी घायकुतीला आल्यासारखे दिसतात. ती त्यांची सुप्त इच्छा असावी. मात्र तसं घडताना दिसत नाही. ज्या संघटनेचा वापर करून नरके सार्वजनिक व्यासपीठावर नाव कमावते झाले, त्या मातृसंस्थेबद्दल नरकेंची अपकारभावना ध्यानी घेण्यासारखी आहे. एखाद्याच्या मदतीबद्दल उपकृत राहण्याऐवजी मदतकर्त्यांलाच सुरुंग लावण्याचा विचार पुरोगामी नाहीच. पण अशा विचार आणि व्यक्तींबद्दल ‘विश्वासघातकी’ याच विशेषणाचा उपयोग केला जातो.
नरके आज मराठा सेवा संघ वा संभाजी ब्रिगेडच्या हितचिंतक, पाठिराखे वा सहानुभूतीदारांना भेटतात आणि त्यांचा जमेल त्या मार्गाने पाठीराख्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. तरीदेखील संघटनेत उभी फूट पडत नसल्याचं पाहून ते काहीसे चिडचिडे झाले आहेत. खेडेकरांच्या पुस्तकातील मते ही लेखक म्हणून स्वत: खेडेकरांची आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन खेडेकर त्यांना जे योग्य वाटेल, ते लिहू शकतात. परंतु नरके खेडेकरद्वेषानं अगदी अंध झाले असावेत. खेडेकरांनी काय लिहावं, काय लिहू नये हे सांगण्याचा नरकेंना काहीच अधिकार नाही.
‘बहुजनहिताय’ या पुस्तकातील खेडेकरांची काही मते नरके लेखात नमूद करतात. ते लिहितात : ‘खेडेकर म्हणतात, औरंगजेबानं बापाला तुरुंगात टाकून मारलं. पण बापाच्या वंशाच्या विचारांचे राज्य देशाबाहेरही विस्तारित केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बापाला शेवटपर्यंत जिवंत ठेवलं, परंतु त्यांच्या विचारांची राजरोस हत्त्या करून महापाप केले आहे. शारीरिक हत्या ही राज्यकारभारात क्षम्य असते. परंतु सामान्य जनतेच्या उत्थानासाठी असलेली विचारधारा नष्ट करणे यास क्षमा नाही. या मापदंडानुसार बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षाही जास्त अपराधी ठरतात. कारण त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना रामदासांच्या दावणीला बांधली. आपल्याच बापाशी प्रतारणा करणारे बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख आहेत.’ वगैरे वगैरे.
खेडेकरांच्या अशाही लेखनाकडे नरके जेव्हा टीकायोग्य दृष्टीने पाहतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते. आणि ते पुरोगामी चळवळीचे वगैरे नसून त्यांच्यात एक इरसाल डँबिसपणा असल्याचं जाणवतं. या मजकुरात नरकेंना टीकायोग्य काय दिसलं? ठाकरे हे बहुजन तरुणांच्या जिवावर ब्राह्मणधार्जिणे राजकारण करतात, हे स्वत:ला चळवळीचे म्हणवून घेणार्या नरकेंना ठाऊक नाही काय? त्याचं जळजळीत उदाहरण म्हणजे ज्या शिवरायांचं नाव घेत ठाकरेंनी चाळीस वर्ष राजकारण केलं, त्या शिवरायांची बदनामी झाली असताना मूग गिळून बसलेले ठाकरे नरकेंना दिसले नाहीत? अन् याच ठाकरेंच्या आरक्षणाबाबतच्या धोरणाचा निषेध म्हणून नरकेंचे राजकीय बॉस छगन भुजबळ शिवसेना सोडून बाहेर पडले होते ना? प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा बाळासाहेबांनी स्वीकारला नाही, प्रबोधनकारांनी ज्या भटी धर्माविरुद्ध एल्गार पुकारला, त्याचा पाच टक्केही अंश बाळ ठाकरेंच्या विचारात दिसत नाही. मग ती मुलानं बापाच्या विचारांची केलेली हत्त्या ठरत नाही तर काय ठरते?
तथापि, नरके झोपेचं ढोंग वठवीत आहेत. त्यांना जाग कशी येणार? टीका करण्यासाठी मुद्दादेखील असावा लागतो. परंतु ओढून-ताणून मुद्दा निर्माण करायचा, अन् त्यावर उठवळ टीकाटिपप्णी करून स्वत:च्या पांडित्याचं प्रदर्शन करण्याची हौस भागवून घेण्याची नरकेंना उबळ येत असावी. त्यांनी लिहिलेल्या संपूर्ण लेखातून त्यांच्या विचारांचा उथळपणा दिसून येतो. कुठंही वैचारिक खोली, प्रगल्भता आणि प्रतिविचार मांडलेला आढळून येत नाही. हे कसलं टीकात्मक लेखन! फार तर त्यांना खेडेकरांबद्दल जो राग आहे, त्यांच्या विरोधात जी मळमळ व्यक्त कराविशी वाटली ती नरकेंनी व्यक्त केलीय. त्याला द्वेष आणि सूडबुद्धीचा वास येतोय. अन् लिखाणातून तो जाणवतोय एवढंच! अशा थिल्लर लिखाणातून कोणाला काय बोध मिळणार!
फुलेविचार म्हणजे हरि नरके व्यक्तिगत संपत्ती समजत असावेत. आपल्याविना समाजात कोणी दुसरा फुलेविचारांचा पुरस्कर्ता असू शकेल, असं ते समजत नसावेत. त्यांना इथं सांगावंसं वाटतं की, महात्मा फुले ही आता केवळ माळी समाजाची ठेव नाही, तर अखिल भारतीय स्तरावर फुले-आंबेडकर विचारांनी सामाजिक घुसळण सुरू केली आहे. आणि भविष्यात केवळ या विचारांच्या धक्क्यानंच अनेक राज्यशकटं कोसळून पडणार आहेत. परंतु त्या फुल्यांच्या गावातच त्यांच्या नावानं राजकीय दुकानदारी सुरू व्हावी अन् त्या दुकानदारीत स्वत:ची भागीदारी नरकेंनी ठेवावी, हे उद्वेगजनक वाटतं.
‘हिंदू राष्ट्र’ हे ज्याचं स्वप्न आहे आणि स्वत:च्या जात-वर्ण हितापलीकडे ज्यांनी देशातील बहुजनांचा कधी विचार केला नाही, ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी स्वातंत्र्यलढयाकडेही पाठ फिरविली, ज्यांनी मनुस्मृती, पुराणे आणि देवळं यांचा आधार घेत बहुजनांना नागवणं आजही चालू ठेवलं आहे, ज्यांनी वर्णवर्चस्व लादून कोटय़वधी बहुजनांना विकासवंचित ठेवलं, ज्यांनी विषमतेचा पुरस्कार करून धर्मा-धर्मात आणि जाती-जातीत भांडणं लावून देश अस्वस्थ केला, जे आजही बहुजनांच्या प्रेरणांची, महानायकांची खुलेआम निंदानालस्ती करतात, जे आजही धर्माच्या नावाखाली बहुजन तरुणांच्या हातूनच बहुजनांचाच वंशसंहार घडवून आणतात आणि मोदी, ठाकरे, बजरंग दल, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी, ज्या प्रवृत्तीचा उदो उदो करीत निरपराध भारतीयांचं शिरकाण करतात, त्या प्रवृत्ती अन् ती माणसे यांच्याविरोधात खेडेकर बोलतात तेव्हा ब्राह्मणधार्जिण्या नरकेंना राग येतो. मात्र, या देशविघातक तत्वांविरुद्ध बोलण्या-लिहिण्याचं धाडस या ‘नवब्राह्मण हरिभाऊ’त नाही. याला ‘वैचारीक बाटगेपणा’ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?
-भैय्या पाटील
bhaiyapatil88@gmail.com
bhaiyapatil88@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा