शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

पुरुषोत्तम खेडेकर यांना जामीन

http://www.esakal.com/esakal/20120412/5048858503954137855.htm


अब्रूनुकसानी प्रकरणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांना जामीन
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 12, 2012 AT 12:25 AM (IST)

कल्याण - "शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने' या पुस्तकाचे लेखक व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी ब्राह्मणांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात डोंबिवलीत राहणाऱ्या प्रकाश दाबके यांनी अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. या प्रकरणी तारखांना सतत गैरहजर राहणाऱ्या खेडेकर यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. बुधवारी या प्रकरणी कल्याण न्यायालयात सुनावणी होती. या वेळी खेडेकर यांच्यासह पुस्तकाचे प्रकाशक किशोर कडू यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर करून त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. 

खेडेकर यांनी लिहिलेल्या "शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने' या पुस्तकात खेडेकर यांनी ब्राह्मणांची बदनामी केल्याप्रकरणी डोंबिवलीतील दाबके यांनी कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा दाखल करून तीन आठवडे उलटले. तीन वेळा या दाव्याची सुनावणीकरिता तारीख लागली होती. तिन्ही वेळा खेडेकर सतत न्यायालयीन कामकाजाच्या वेळी गैरहजर राहिले. न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट बजाविले. न्यायालयाने वॉरंट बजाविल्याने खेडेकर यांनी आज कल्याण न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाविषयी आपणास काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयासमोर लेखक खेडेकर व कडू हे हजर राहिले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राजेंद्र आहिरे यांनी खेडेकर व कडू यांना अब्रूनुकसानी प्रकरणी प्रत्येकी 15 हजाराचा जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खेडेकर यांचे वकील गणेश घोलप यांनी दिली. आपण कोणाचीही बदनामी करणारा मजकूर पुस्तकात मांडलेला नाही. जे काही लिखाण केले आहे ते वस्तुस्थितीला धरून आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे नाही, असे खेडेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
===========================

तरुणांनो एकाच दिशेने चला, झोकून द्या
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 05, 2011 AT 12:00 AM (IST)

औरंगाबाद - तरुणांना एका दिशेने चालत रहा. हाती घेतलेल्या कामात स्वतःला झोकून द्या. तुम्ही निश्‍चित यशस्वी व्हाल, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी मंगळवारी (ता.चार) केले.

ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंत कला महाविद्यालयात संभाजी ब्रिगेड मराठा महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. 

या अधिवेशनात "तरुणांनो जागे व्हा' या विषयावर प्रदीप सोळुंके बोलत होते. या महाअधिवेशनाचे उद्‌घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर होते. मनोज आखरे, सोमेश्‍वर आहेर, अनंत चोंधे, संभाजी ब्रिगेडच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विकास पासलकर, विंग कमांडर टी. आर. जाधव, जे. के. जाधव, श्रीमती इराळे, श्रीमती वैशाली डोळस, प्रा. प्रकाश धोटे, संजीव भोर, शांताराम कुंजीर, विठ्ठल पावडे, सुभाष बोरकर, सोमनाथ नवले, विजय सोमवंशी, आत्माराम शिंदे, राहुल बनसोड, प्रा. देवीदास वडजे, माणिक शिंदे याची विशेष उपस्थिती होती.

"मास्तर होण्यास दहा लाख लागतात. कलेक्‍टर होण्यास एक रुपयाही नाही'
प्रदीप सोळुंके म्हणाले, डोक्‍याच्या मालीशपासून बुटाच्या पॉलीशपर्यंत कोणताही धंदा करायला लाजू नका. जगात हजारो क्षेत्र आहेत जेथे आपण जाऊ शकतो. आपल्या समाजातील तरुणांनी अधिकारी झाले पाहिजे. स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. मास्तर होण्यासाठी आता दहा लाख रूपये लागतात. कलेक्‍टर होण्यासाठी एक रुपयाही लागत नाही, असे त्यांनी सांगितले. आपल्या घरात महापुरुषांचे फोटो लावा त्यांच्या प्रेरणेने आपली मुलंही इतिहास घडवतील, असा उल्लेख त्यांनी केला.

जातीय, धार्मिक दंगे संभाजी ब्रिगेडमुळे बंद 
महाराष्ट्रात जातीय, धार्मिक दंगे संभाजी ब्रिगेडमुळे बंद झाले. विचारांचे सुरुंग पेरण्याचे काम पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा समाजाला वेग दिला. मराठा समाजातील व्यक्तीला जबाबदार बनवले. तरुणांना विचार देण्याचे काम खेडेकरांनी केले, असा उल्लेख त्यांनी केला. 
प्रकाश धोटे यांचे "अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज' या विषयावर व्याख्यान झाले. अंधश्रद्धेचा उगम भीती आणि लालच यातूनच आहे. भीती आणि लालच सोडून दिली पाहिजे, असे ते म्हणाले. 

बालाजी जाधव, राहुल बनसोडे यांचेही या वेळी भाषण झाले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आत्माराम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष संभाजीराजे बनकर यांनी आभार मानले.
===========================



२ टिप्पण्या: