http://www.islamdarshan.org/node/1173
-भाऊ तोरसेकर
चटकन कुणाला वाटेल की, पत्रकारांवरील हल्ला हे मी केलेले विषयांतर होते. पण वस्तुस्थिती तशी नाही. पहिली गोष्ट म्हणजे माध्यमात आणून ओतलेला प्रचंड काळा पैसा ही समस्या भ्रष्टाचाराशी संबंधीत आहे आणि त्याचाही देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराशी घनिष्ठ संबंध आहे. किंबहुना भ्रष्टाचार प्रतिष्ठीत करण्यासाठी आधी समाजाची बुद्धी कमीतकमी प भ्रष्ट करावी लागते. याचा म्हणूनच पत्रकारितेशी घनिष्ठ संबंध आहे. स्वत:ला टिकाकार, विश्लेषक म्हणविणाऱ्या शहाण्यांनी भ्रष्टाचारात ओढून घेतले मग भ्रष्टाचार करणाऱ्यांना अभय मिळत असते. खेडयापाडयात वा तालुका-शहरात ठेकेदार, कंत्राटदार, राजकारणी यांचाच भ्रष्टाचार चालतो आणि त्यांच्या आश्रयाने आशीर्वादाने लहानमोठी वृत्तपत्रे चालतात. त्यांचेच वर्चस्व पत्रकार संघटनांवर असते. अशारीतीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवले मग भ्रष्टाचाराला मोकाट रान मिळत असते. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत करोडो रुपये विना पावतीचे घेऊन ‘लोकमत‘ दैनिकाने मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या पुरवण्या छापल्या. त्याचा पर्दाफाश निखिल वागळे आयबीएन लोकमत वाहिनीवर करू शकत नाही. पण प्रकाश आकोलकर, हेमंत देसाई त्याबाबतीत गप्प कशाला होते. महाराष्ट्रातल्या कुठल्या झुंजार पत्रकाराला त्या पापाचा घडा फोडायची हिमंत का झाली नाही? तसे केल्यास त्यांना वाहिनीवरची दारे बंद झाली असती ना? तिकडे दूर मद्रासच्या ‘द हिंदू‘ वृत्तपत्राच्या पी.साईनाथ या पत्रकाराने तो मामला उघडकीस आणला. हा सर्व व्यवहार देसाई महोदयांना ठाऊक नव्हता? मोठेमोठे पगार सुविधा देऊन या झुंजार पत्रकारांना आश्रित बनवले जाते. मग त्याचीच चटक लागल्यावर मालकाच्याच नव्हे तर त्याच्या मित्र परिचितांवरही भुकायची सोय राहत नाही. अशावेळी मग आपली आक्रमकता दाखवायला अडसूळ, जितेंद्र आव्हाड असे किरकोळ नेत्यांना लक्ष बनविले जाते. रक्ताला चटावलेली श्वापदे मोकाट शिकारी करत फिरत असतात आणि रखवालदार गवत चरणाऱ्याल ससे वा खारींची शिकार करून आपल्या मर्दानगीचे प्रदर्शन मांडतात, तशी आज पत्रकारितेची दयनिय अवस्था झाली आहे. (काळा पैसा, बेकायदेशीर उद्योगातून आलेला पैसा यावर पत्रकारितेची, माध्यमांची गुजराण चालू आहे. त्यामुळे कधी दिखावू भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडी पाडली जातात. पण त्याचा स्फोट होण्याची शक्यता दिसली मग ताबडतोब त्यावर पांघरूण घालण्याची धापपळ सुरू होते. अण्णा हजारेंच्या एपिल्र २०११ च्या जंतरमंतर प्रकरणाचे माध्यमातून जोरदार कौतुक झाले. कारण त्यातून पुढे काहीच साधले जाणार नाही याची माध्यमांच्या आश्रयदात्यांना खात्री होती. पण ऑगस्ट महिन्यात लोकपालाचे प्रकरण भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणायच्या दिशेने वाटचाल करू लागतात. माध्यमांचे पावित्रे बदलतात.
कालपर्यंत अण्णांचा आवेश आणून राजकीय नेत्यांना सवाल करणारे पत्रकार अण्णा टीमलाच शंका विचारून भंडावून सोडू लागले. त्याविषयी गैरसमज पसरविण्यात माध्यमांनी पुढाकार घेतला. कारण आजच्या बुद्धीवाद्यांचे प्रसार माध्यमांचे हितसंबंध इथल्या भ्रष्टाचारात, भ्रष्ट व्यवस्थेत सामावलेले आहेत. दोन दशकात माध्यमांवर काळा पैसा वावरून भ्रष्टचार्यांरना निर्णायक नियंत्रण मिळले आहे. ज्या समाजात बुद्धीवादी पर्ग भ्रष्ट सत्तेचा भागीदार नसतो ती भ्रष्ट समाजव्यवस्था कधीच टिकू शकत नाही. तिथे भ्रष्टाचार इतका बोकाळत नाही. बुद्धीवाद्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय अन्याय सत्ता निश्चित कारभार करू शकत नाही. आज आपल्या देशात जो भ्रष्टाचार अनिर्बध पसरलेला दिसतो त्याचेही तेच कारण आहे. प्रसारमाध्यमे आणि पत्रकारांना या पापात सहभागी करून घेण्यात आले आहे. नुसत्या भ्रष्ट राजकारणी व उद्योग समुहांनीच नव्हे तर गुन्हेगारी टोळयाही आता पत्रकारांना आश्रय देत असतात. छोटा राजन याने ‘मिड डे‘ दैनिकाचा पत्रकार ज्योतिर्मय डे यांची हत्या घडवून आणली, त्या प्रकरणात राजनची साथीदार म्हणून जिग्ना शहा नावाच्या महिला पत्रकाराला अटक झाली आहे. ज्योर्तिमय डे हा छोटा शकीलचा हस्तक असल्याचा संशयावरून हे हत्याकांड घडल्याचे म्हटले जाते. त्या हत्याकांडानंतरही पत्रकारांनी संरक्षणाचा कायदा करण्यासाठी मोर्चा काढलेला होता. ती हत्या कुणी राजकारणी गुंडाने केली नव्हती. दुसऱ्या पत्रकाराच्या मदतीनेच हत्याकांड घडले. मग हे मार्चेकरी कुणापासून संरक्षण मागत होते? एका पत्रकाराला दुसऱ्या हल्लेखोर पत्रकारांपासून संरक्षण कसे देणार? कॉँग्रेसचा, सेनेचा, भाजपाचा, दाऊदचा, शकीलचा, राजनचा असे पत्रकारांवर शिक्के का बसले आहेत? आपण स्वतंत्र बाण्याचे पत्रकार राहिलो नाही ही आजची वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच पत्रकारितेतला भ्रष्टाचार एकूण भ्रष्टाचार निर्मूलनातील सर्वात महत्वाची बाब आहे. राखणदारी कशी चालते? कुठे गडबड दिसली तर तो राखणदार आरडाओरड करतो आसपासच्या लोकांना जागे करतो. तेच त्याचे काम असते. चोर दरोडेखोरांशी त्याने एकटयाने लढावे ही अपेक्षा नसते. पण तोच दरोडेखोरांना सामील झाला तर लोकांना जागविल्याचे काम करत नाही. त्यामुळेच मोठा दरोडा सहजासहजी घालता येतो. बुद्धीवादी व पत्रकारांचे काम राखणदाराचे असते. समाजातील अपकृत्ये, भ्रष्टाचार यावर त्याने काहुर माजवायचे असते. तोच भ्रष्टाचाऱ्यांना सामील झाला, त्यांचा भागीदार वा आश्रित झाला तर भ्रष्टाचार बोकाळणारच. असा लबाड भामटा, राखणदार काय करतो? त्याने गप्प राहूनही लोकांना जाग आली मग चोर पळाले. त्याच्या ऐवजी भलत्याच दिशेने बोट दाखवतो त्याला दिशाभूल म्हणतात. आज भ्रष्टाचार विरोधी जनता व आंदोलने याबाबत प्रसारमाध्यमांची भूमिका नेमकी तशीच नाही काय? ए. राजा व चिदंबरम प्रकरणात याचिकाकर्ता सुब्रह्मण्यम स्वामी व चिदंबरम वा परोधी पक्षांचा राजकीय हेतू ठळकपणे मांडताना माध्यमे कोणती भूमिका बजावत आहेत? स्वामींचा हेतू राजकीय असला म्हणून चोरांना चोरी माफ करायची का? चोराला किंवा भ्रष्टचाराला धर्म नसतो तसाच राजकीय तत्वज्ञान किंवा पक्ष नसतो. मग स्वामी यांच्या राजकीय वारसा व हेतूवर चर्चा करायचे कारणच काय? त्यालाच दिशाभूल म्हणतात. त्यातून जनतेचे लक्ष चोरावरून भ्रष्टाचारावरून उडविण्याचा माध्यमांचा हेतू लपत नाही. दरोडेखोर चोर चोरी करत असतील. भ्रष्ट मंडळी भ्रष्टाचार करत असतील. पण या सर्व गोष्टी आपल्या म्हणजे सामान्य नागरिकांच्या पचनी पाडल्याचे काम आज माध्यमांकडून होत आहे. त्याबद्दल जनमानसात चीड निर्माण करण्यापेक्षा आपोआप निर्माण होणारा प्रक्षोभ सौम्य करायला माध्यमे धडपडताना दिसतात. एकीकडे वरखड, सडेतोड बाणा असल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे गुन्हेगाराला पाठीशी घालायचे, हा बौद्धिक भ्रष्टाचार असतो. बुद्धी भ्रष्ट झाली मग माणसाकडून भ्रष्टाचारी कृत्ये घडत असतात. त्याचे त्याला काही वाटत नाही. बुद्धीजीव वर्ग, प्रसार माध्यमे शेवटी समाजाची सामुहिक बुद्धी असते. आज तिलाच व्यापारी, उद्योगपती, राजकारण्यांनी मोहजालात अडकवून भ्रष्ट केले आहे. ज्या समाजाची बुद्धी अशी भ्रष्ट बुद्धीवर उपाय योजण्याची गरज आहे. त्याची सुरुवात प्रसारमाध्यमे व बुद्धीवादी वर्गात शिरलेल्या भ्रष्टाचारापासून करायला हवी. ( साभार : दै. पुण्यनगरी ) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा