शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

इस्लामी शरीअत (कायदेशास्त्र)....

http://www.islamdarshan.org/node/847


इस्लामी शरीअत (कायदेशास्त्र)....

।। अल्लाह असीम दयावंत व कृपावंत च्या नावाने ।।

इस्लाम एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. जीवनाच्या प्रत्येक्ष क्षेत्रात अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे परिपूर्ण आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाहने अवतीर्ण केलेले मार्गदर्शन (कुरआन) आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यानुसार केलेले आचरण व शिकवण (हदीस, सुन्नत) या दोहोंच्या आधारे शरीअत अस्तित्वात येते.

अल्लाहचे आदेश आहे
‘‘जे लोक अल्लाहच्या आज्ञेनुसार निर्णय करत नाहीत तेच वास्तविकपणे अवज्ञाकारी आहेत.’’    (सूरह-माईदा)
तात्पर्य असे की, कोणत्याही मुस्लिमासाठी हे शक्यच नाही की त्याने अल्लाहच्या आज्ञांच्या विरूद्ध वागावे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे सुकथन... ‘‘तुमच्यापैकी कोणीही तोपर्यंत इमानधारक होऊ शकत नाही जोपर्यंत तो आपल्या इच्छा-आकांक्षांना त्या शरीअतच्या अधीन करत नाही जी मी घेऊन आलो आहे.’’    (हदीस)
मुस्लिम म्हणून जगू इच्छिणार्या प्रत्येक व्यक्तिसाठी अनिवार्य आहे की, त्याने आपले संपूर्ण जीवन शरीअत नुसार व्यतित करावे. प्रत्येक मुस्लिमाने शरीअतच्या विरूद्ध असणार्या व इस्लामी शिकवणींशी मेळ न खाणार्या अशा तमाम अनिष्ठ रूढी-परंपरा व असभ्य, अवैध प्रथा सोडल्याच पाहिजेत. इस्लामची प्रत्येक मुस्लिमाकडून हीच अपेक्षा असून शरीअत विरुद्ध वागणे निषिद्ध (हराम) आहे.
विवाहाच्या बाबतीत ज्या अनेक कुप्रथा व इस्लामबाह्य रूढी प्रचलित आहेत त्यांपैकी एक हुंडा व दहेजची कुप्रथा आहे, जी शरीअतमधील ‘महर’च्या अगदी विरुद्ध निर्मिती आहे.
शरीअतने विवाहाच्या बाबतीत वधूपक्षावर कोणतीही जबाबदारी टाकलेली नाही. उलट पक्षी वरपक्षानेच आपल्या ऐपतीनुसार आवश्यक बाबींवर खर्च करणे भाग आहे.
अल्लाहचे मार्गदर्शन आहे
‘‘पुरुष स्त्रियांचे विश्वस्त व पालक आहेत......यास्तव की ते आपली संपत्ती खर्च करतात.’’    (सूरह अन्निसा)
संपत्ती खर्च करण्याने अभिप्रेत पत्नीची वस्त्रे, आभूषणे, महर, विवाहोत्तर मेजवानी (वलीमा) आणि पत्नीच्या उदर निर्वाहाच्या खर्चाचा समावेश आहे. विवाहाप्रसंगी ‘महर’ अनिवार्य आहे. त्याची अदायगी जर रोखीने (महर-ए-मुअज्जल) करण्यात आली तर ते उत्कृष्ट आहे. अन्यथा जर उधार व नंतर दिला जाणार असेल. (महर-ए-मौज्जल) तर तो कधी आणि कशाप्रकारे अदा करणार हे निश्चित केले गेले पाहिजे. परंतु महर जर तोंडी जमा-खर्चा पुरताच असेल आणि पतिची तो अदा करण्याची इच्छाच नसेल तर अशा पतिबाबत प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश
‘‘ज्याने ठराविक महरच्या उधार, (महर-ए-मौज्जल) मोबदल्यात विवाह केला मात्र मनात महर अदा करण्याचा इरादाच नसेल तर तो पति नव्हे, व्यभिचारी आहे.’’    (हदीस)
यावरून स्पष्ट होते की महर अदा न करणे किती भयंकर अपराध आहे. सध्या विवाहात महरला नगण्य अथवा दुय्यम स्थान दिले जाते मात्र दहेज व हुंड्याला अग्रस्थान दिले जाते. ‘महर’ अतिशय कमी ठरविला जातो व तोही उधार, पण दहेज व हुडां जो निषिध्द व हराम आहे तो मात्र भरमसाठ ठरवतात व तोही रोख घेतला जातो. या हराम असलेल्या दहेज व हुंड्याचे प्रदर्शन केले जाते. ते पहाण्यासाठी लोक येतात व त्याची वाहवा करतात. अशा प्रकारचा हरामाचा माल जेवढा अधिक मिळेल तेवढी वराची अपेक्षा व लालसा वाढतच जाते.
अल्लाहचे आदेश आहे
‘‘हे इमानधारकांनो ! एक दुसर्याचा माल अवाजवी, नाहकपणे हिरावून घेऊ नका.’’    (सूरह निसा)
या क्रूर व जीवघेण्या हुंडा व दहेजच्या प्रथेला खतपाणी घालण्यात धर्मपंडीत, धार्मिक नेते आणि विचारवंतांचेही मोठे योगदान आहे. हे लोक हुंड्याविरुद्ध घसा कोरडा होईपर्यंत भाषणे करतात. त्याचे दुष्परिणाम देखील वर्णन करतात आणि दुसर्याच श्वासात या प्रथेला खुद्द प्रेषित मुहम्मद (स.) यांची मान्यता असल्याचे सांगून तिचे समर्थनही करतात. पुराव्यादाखल अली (र.) आणि फातिमा (र.) यांच्या विवाहाचे उदाहरण दिले जाते. ते असे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या दोहोंच्या विवाहाप्रसंगी दहेज दिला होता आणि तपशिलात चादर, उशी, पाण्याची लहान, अंथरूण, चक्की (जाते) वगैरे  यादी सादर करतात.
हा संदर्भ घेऊन युक्तिवाद केला जातो की, खुद्द प्रेषित मुहम्मद (स.) यांनीच आपल्या मुलीला असा दहेज दिला असल्यामुळे तो प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आचरण व शरीअतला अनुसरूनच आहे. त्याच्या विरुद्ध बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वरील घटनेला प्रमाण मानून एका क्रूर व शरीअतच्या विरुद्ध असलेल्या हुंडा प्रथेला मोठ्या चातुर्याने ‘पवित्र’ व ‘शरीअतमान्य’ ठरविले जाते.
वास्तविक घटना अशी आहे की, अबूतालिब (प्रेषित मुहम्मद (स.) याचें चुलते) हे विकलांग व गरीब होते. त्यांचे कुटूंब मात्र मोठे होते. यास्तव प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अबूतालीबांच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी बनू हाशिम घराण्यात विभाजित केली. त्यापैकी एक पुत्र अली (र.) यांच्या पालन पोषणाची जबाबदारी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्वीकारली. अली (र.) तारूण्यात आल्यावर प्रेषित (स.) यांनी आपली सुकन्या फातिमा (र.) हिचा विवाह अली (र.) यांच्या सोबत करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अली (र.) यांना विचारले, ‘‘तुमच्यापाशी काय आहे?’’ अली उत्तरले, ‘घोडा आणि चिलखत’. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की, ‘चिलखत विकून टाका.’ ती माननीय उस्मान (र.) यांनी ४८० दिरहमच्या मोबदल्यात खरेदी केली. या रकमेतून वर दर्शविलेल्या गृहोपयोगी वस्तू खरेदी केल्या. या वस्तू अली (र.) यांच्या पैशातून घेतल्या असल्याने त्यांना ‘दहेज’ कसे म्हणता येईल? उर्वरीत रकमेतून ‘महर’ आणि विवाहोत्तर भोजन (वलीमा) आदींसाठी खर्च करण्यात आला. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या वस्तू स्वतः जरी दिल्या असत्या तरी अलींच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्याकडेच असल्याने त्या वस्तू हुंडा अथवा दहेज कदापि ठरत नाहीत.
दुर्दैवाने काही लोकांची अली (र.), फातिमा (र.) व त्यांच्या संततिलाच इस्लामच्या केंद्रस्थानी मानून त्यांनाच इस्लामच्या शिकवणींचा आधार बनविले आहे. मात्र त्यांच्या इतर कन्यांकडे हे लोक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. आपल्या इतर कन्यांना प्रेषित मुहम्मद (स.) यांनी काय दहेज दिला याचा हे लोक उल्लेख करत नाहीत. वास्तव हे आहे की, खुद्द प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अनेक विवाह केले. आपल्या कन्या जैनब (र.), रूकैया (र.), उम्मेकुलसूम (र.) यांचेही विवाह केले. याशिवाय त्यांचे सोबती (सहाबी) चार आदर्श खलीफा (र.) व नंतरच्या सुप्रसिद्ध मुस्लिम विद्वानांच्या विवाह प्रसंगी कुठेही ही दहेजची कुप्रथा सापडत नाही. जर दहेजची प्रथा प्रेषितांना व धर्मशास्त्रास मान्य असती तर ते शरीअत ने सर्व मुस्लिमांना अनिवार्य केले असते.
ही गोष्ट वराच्या पुरुषार्थाला ही शोभत नाही की, त्याने वधूकडील पोषाख परीधान करून विवाह करावा. वधू पक्षाकडून हुंड्याच्या स्वरूपात घेतलेल्या संपत्तीवर ऐश, विलास करावा. आपल्या भावी पत्नीजवळ हुंड्याची मागणी करावी किवा मिळेल त्याचा निर्लज्जपणे स्वीकार करावा. ही तर त्याच्या पति नव्हे, भिकारी असण्याची लक्षणे आहेत.
मुलीवर एक घोर अन्याय स्वतः तिचे माता-पिता करतात. ते देहज व हुंडा कसेही करून स्वखुषीने देतात. मात्र मुलीला वारसाहक्कापासून वंचित ठेवतात. हा मुलींचा शरीअत अनुसार अनिवार्य हक्क आहे. जर हा ऐहिक जीवनात दिला गेला नाही तर पारलौकिक जीवनात द्यावाच लागेल.
एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, अल्लाहने पुरुष व स्त्रीची जोडी वंशवृद्धी साठी बनविली आहे. स्त्री ही आई, बहीण, मुलगी, सून वगैरे असते. मनुष्य स्त्री पोटी जन्म घेतो म्हणून तिचा आदर-सम्मान व प्रतिष्ठा राखली पाहिजे. स्त्रीला संपत्ती प्राप्तीचे साधन कदापि समजू नये.
स्त्रीचे कर्तव्य मुला-बाळांचे संगोपन, घराची देखभाल, कुटुंबामध्ये सुख-शांती प्रदान करणे व आपल्या घराला स्वर्गासमान बनविणे हे आहे. स्त्रीचे हे उद्देश नजरे समोर नसल्याने तिला धन, सामुग्री (दहेज हुडंा) प्राप्तीचे साधन समजले जाते. म्हणूनच रोज हुंडाबळी किवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या बातम्या वाचायला व ऐकायला मिळतात, हे एक दुर्दैव आहे.
या अत्याचाराला जबाबदार कोण ?
-    काय त्या मुली ज्या हुंडा देऊ शकत नाहीत?
-    काय ते माता-पिता जे कन्येच्या जन्मापासून हुंड्याच्या चितेने त्रस्त होऊन शेवटी कर्जबाजारी आणि दिवाळखोर होत आहेत?
-    काय तो मुस्लिम समाज जो या कुप्रथेच्या बाबतीत असंवेदनशील झाला आहे? नववधूंना हुंडाबळी होताना पाहूनही जो निष्क्रीय भूमिका घेतो.
-    काय ते धनदांडगे लोक जे आपल्या नाव लौकीकासाठी संपत्तीचे प्रदर्शन करतात?
-    काय ते धर्म पंडीत जे हुंड्याच्या विरोधात भाषणबाजी तर करतात पण प्रत्यक्षात स्वतः हुंडा घेऊन किवा देऊन त्याचे अप्रत्यक्ष समर्थनही करतात?
-    काय ते धार्मिक नेते ज्यांनी मोठ्या चातुर्याने हुंड्यास पवित्र व शरीअतमान्य बनविले आहे?
अल्लाह समस्त मुस्लिमांना शरीअत नुसार वागण्याची सद्बद्धी देवो व शरीअतचा अपमान करण्यापासून परावृत्त करो. ही दुआ !                    आमीन.
इस्लाम मध्ये नारीचे स्थान
आई
माननीय अबू हुरैरा (र.) चे कथन आहे की एक मनुष्य प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कडे आला व म्हणाला,
-  ‘‘हे अल्लाहचे प्रेषिता ! माझ्या सद्व्यवहारास सर्वाअधिक योग्य कोण आहे?’’
प्रेषित म्हणाले ! ‘‘तुझी आई !’’
त्याने विचारले, ‘‘त्यानंतर कोण?’’
प्रेषित म्हणाले ! ‘‘तुझी आई !’’
त्याने पुन्हा विचारले, त्यानंतर कोण?’’
प्रेषितांनी सांगितले, ‘‘तुझी आई !’’
त्याने विचारले, त्या नंतर कोण?’’
मग प्रेषित म्हणाले, ‘‘तुझे वडील’’    (हदीस)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे ही सांगितले आहे,
-  ‘’आईच्या पायाखाली स्वर्ग आहे,’’    (हदीस)
पवित्र कुरआनमध्ये अल्लाहने सांगितले आहे !
-  ‘‘आम्ही मनुष्याला आदेश दिला की, त्याने आपल्या आई वडीलांशी सद्व्यवहार करावा त्याच्या आईने त्रास सहन करून त्याला नौमहीने पोटात ठेवले आणि कष्ट सहन करून त्याला जन्म दिला. त्याला गर्भात ठेवण्यात व स्तनपान करविण्यात तीस महीने लागले.’’                (सुरे अहकाफ - १५)
पत्नी
पवित्र कुरआन मध्ये अल्लाहने सांगितले आहे की,
-  ‘‘त्याच्या चिन्हापैकी असे ही आहे की, त्याने तुम्हासाठी तुमच्यापैकी जोड्या बनविल्या, जेणे करून तुम्ही त्यांच्या जवळ शांती प्राप्त करावी आणि तुमच्यात प्रेम व कृपा उत्पन्न केली. निश्चितच यात संकेत आहेत, त्या लोकांसाठी जे चितन व मनन करतात.’’                (सुरतुर्रुम, २१)
-  प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले ‘‘कोणत्याही श्रद्धावंताने एखाद्या श्रद्धावंत स्त्रीशी (पत्नीशी) घृणा करू नये तिची एखादी सवय आवडली नाही तर दुसरी आवडेल.    (हदीस)
प्रेषितांना प्रश्न केला गेला की सदाचारी व पुण्यशील नारी मध्ये कोणते गुण असतात?
-  ‘‘प्रेषितांनी उत्तर दिले !’’ की जेव्हा पति तिला पाहील तेव्हा पत्नीने त्याला प्रसन्न करावे जेव्हा एखादी आज्ञा करील ती मान्य करावी आणि आपले शील व त्याच्या संपत्तीचे रक्षण करावे आणि त्यात त्याची अवज्ञा करू नये.’’    (हदीस)
दुसर्या एका प्रश्नाचे उत्तर देतांना प्रेषितांनी सांगितले की,
-  ‘‘हे जग जीवन व्यतीत करण्यासाठी संपत्ती आहे आणि त्यातील सर्वोत्तम संपत्ती पुण्यशील स्त्री आहे.’’                (हदीस)
मुलगी
प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवणूक आहे
-  ज्या कोणाच्या तीन मुली अथवा तीन बहिणी असतील अथवा दोन मुली व दोन बहिणीच असतील आणि त्याने त्यांच्याशी चांगली मैत्री अवलंबिली आणि त्यांच्या संबंधाने अल्लाहचे भय बाळगले, तर त्याच्यासाठी स्वर्ग आहे.     (हदीस)
-  ‘मुलींचा तिरस्कार करू नका. त्या तर दुःख भंजक आणि अत्यंत मौल्यवान आहेत.’    (हदीस)
-  ‘निःसंशय दानधर्म करणारे पुरुष व दानधर्म करणार्या स्त्रिया आणि ज्यांनी अल्लाह चांगले ऋृण दिले त्यांना वाढवून दिले जाईल व त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे.’    (हदीस)
-  पत्नीला टोमणे मारू नका. तोंडावर मारू नका. तिचे मन दुखवू नका. तिला सोडून जाऊ नका.    (हदीस)
-  पत्नी आपल्या पतिच्या जागी (त्याच्या गैरहाजरीत) सर्व अधिकारांची मालकीण आहे.    (हदीस)
-  आपल्या पत्नीशी दासी समान व्यवहार करू नका. तिला मारू ही नका.    (हदीस)
-  तुमच्यापैकी सर्वश्रेष्ठ मनुष्य तो आहे जो आपल्या पत्नीशी चांगला व्यवहार करतो.    (हदीस)
प्रेषित मुहम्मद यांचे उपदेश
-  तुमच्यापैकी कोणीही बाजारात भाव वाढावेत म्हणून (धान्य वगैरे) वस्तू न विकता (साठा करून) ठेवू नका असे करणारा घोर यातनेस पात्र आहे.
-  दुसर्याचे अपराध क्षमा करीत जा. दुसर्यांच्या दोषांचा प्रचार करू नका ते लपवा, ईश्वर तुमच्या दोषांवर पांघरूण घालील.
-  खोटे बोलणे, चहाड्या करणे, खोटे आरोप करण्यासापासून दूर रहा लोकांना वाईट नावाने हाक मारू नका.
-  अश्लिलता व निर्लज्जतेपासून दूर रहा, मग ती उघड असो की गुप्त.
-  दिखाऊपणाचे कृत्य करू नका गुप्त दान करा. उपकार करून त्याची जाणीव करून देवू नका.
-  रस्त्यावरील त्रासदायक वस्तू (काटे, दगड, धोंडे) काढून टाका.
-  आपले वचन व प्रतिज्ञापूर्ण करा.
-  सत्य व न्याय साक्ष द्या. मग तुमचे स्वःताचे अथवा तुमच्या कुटुंबियाचे नुकसान झाले तरी बेहतर
-  मजुराचा घाम वाळण्यापूर्वी  त्याची मजुरी द्या. कोणत्याही नोकराकडून त्याच्या शक्ती प्रमाणे कामे करवून घ्या. त्याला विश्रांती द्या. तुम्ही स्वःता जे खाल ते त्याला द्या व जे स्वःता परिधान कराल ते त्याला सुद्धा उपलब्ध करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा